नवी दिल्ली : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात जोधपूरच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पण ते ट्विट हार्दिकने केलंच नव्हतं अशी नवी माहिती आता समोर येत आहे. हार्दिक पांड्याच्या पॅरोडी अकाउंटवरून हे ट्विट केलं होतं अशी माहिती आहे.

@hardikpandya7 हे हार्दिक पांड्याचं अधिकृत ट्विटर हॅंडल आहे, पण ज्या ट्विटवरून पांड्या अडचणीत आला ते ट्विट @sirhardik3777 या पॅरोडी अकाउंटवरून करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कोर्टात तक्रार देखील @sirhardik3777 याच अकाउंटविरोधात करण्यात आल्याची माहिती आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

या तक्रारीवरून हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती. आज ती मागणी मान्य करत कोर्टाने , पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण आता नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे पांड्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.