इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी सध्या भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान रुहानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शनिवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीनंतर हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांदरम्यान ९ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी दोन्ही देशांचा शेजारी देश असणारा अफगाणिस्तान दहशतवादमुक्त आणि सुरक्षित रहावा अशी इच्छा आम्ही व्यक्त करीत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्यावतीने म्हणाले.

चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताला नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इरानचे आभार मानले. दरम्यान, रुहानी यांनी सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी रुहानी यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

मोदी म्हणाले, २०१६ मध्ये मी तेहरानचा दौरा केला होता. मात्र, आपण भारतात येऊन आपले द्वीपक्षीय संबंध आणखी घट्ट आणि मजबूत केले आहेत. आपण आम्हाला चाबहार बंदराच्या विकासात नेतृत्व प्रदान केल्याने मी आपले आभार मानतो. ईरान आणि भारताचा शेजारी देश असणाऱ्या अफगाणिस्तानला दोन्ही देशांना दहशतवादमुक्त होताना पहायचे आहे, असेही यावेळी मोदी म्हणाले.

दरम्यान, इराणचे ऱाष्ट्रपती रुहानी म्हणाले, दोन्ही देशांचे संबंध हे व्यापार आणि व्यावसायिक संबंधांच्या अधिक पुढे गेले आहेत. आम्ही दोन महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे. आम्हाला दोन्ही देशांदरम्यान रेल्वे प्रकल्प विकसित करण्याची इच्छा आहे. दोन्ही देश सध्या चाबहार बंदर विकसित होताना पाहत आहेत.