अटकपूर्व जामिनासाठी चिदंबरम यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल असताना त्यावर कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच सीबीआयने ज्या प्रकारे चिदंबरम यांना अटक केली ही बाब भारतासाठी लाजिरवाणी असल्याचे डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन यांनी म्हटले आहे.

स्टालिन म्हणाले, सीबीआयने ज्या प्रकारे चिदंबरम यांच्या घराच्या सीमाभिंतीवरुन उड्या टाकून आत प्रवेश करीत त्यांना अटक केली हे मी देखील टीव्हीवर पाहिले. असला प्रकार हा भारतासाठी लाजिरवाणा आहे. यावरुन ही अटक राजकीय सुडभावनेतून केल्याचे स्पष्ट होते. चिदंबरम यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केलेला असताना त्यांना अटक होणे हे निषेधार्ह आहे.

तब्बल २७ तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणींत वाढच होत आहे.

अटक होण्याआधी काँग्रेस मुख्यालयात बुधवारी चिदंबरम यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, ‘‘मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला. पण मी उलट न्यायासाठीच गेले २७ तास माझ्या वकिलांशी चर्चा करीत होतो. मी कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. मी, माझा मुलगा किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. शुक्रवारी मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहे”