25 September 2020

News Flash

मसाला व्यापाऱ्याने कुटुंबाच्या मदतीने घडवले श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट

हल्लेखोराच्या पत्नीला अटक करण्यासाठी पोलीस बंगल्यात गेले असता तिने स्वत:ला उडवून दिले

इमसथ अहमद इब्राहिम (उजवीकडे) आणि मोहम्मद यूसूफ इब्राहिम

श्रीलंकेमध्ये इस्टर संण्डेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बहल्ल्यांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे हल्ले घडवणारे हल्लेखोर हे देशातील लोकप्रिय मसाला व्यापाऱ्याची मुले असल्याचं तपासात समोर आले आहे. मसाला व्यापारी मोहम्मद यूसूफ इब्राहिम यांना या हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोहम्मद यांची मुले इल्हाम अहमद इब्राहिम आणि इमसथ अहमद इब्राहिम या दोघांनी स्वत:ला शांगरी-ला आणि सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये आत्मघाती हल्ला करत स्फोट घडवून आणला. बंगले, गाड्या, अमाप संपत्ती असणाऱ्या या कुटुंबातील दोन मुलांनी स्वत:ला उडवून दिले तर सुनेही स्वत:ला उडवून देत स्फोट घडून आणला. स्फोटात सहभागी असणारे सर्वच आत्मघाती हल्लेखोर हे इब्राहिम कुटुंबाच्या मित्र परिवारातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार तपास अधिकारी पुरावे गोळा करण्यासाठी मोहम्मद यांच्या कोलंबो येथील बंगल्यात गेले असता तेथेही एक स्फोट झाला. महावेला गार्डन्स या उच्चभ्रू वस्तीमधील व्हाइट हाऊस नावाच्या बंगल्यामध्ये हा स्फोट झाला. या बंगल्यात मोहम्मद यांचे संपूर्ण कुटुंबाचे वास्तव्य होते. पोलीस चौकशीसाठी या बंगल्यात गेले असता तेथे मोहम्मद यांची सून फातिमा हिने स्वत:ला आपल्या तीन मुलांसहीत उडवून देत आत्मघाती स्फोट घडवल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

मोहम्मद यांनीच आपल्या मुलांना हे हल्ले करण्यासाठी प्रेरित केल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या मुलांना हे हल्ले करण्यासाठी उकसवणाऱ्या आणि मदत केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद यांना अटक करण्यात आल्याची माहिती सीएनएनला पोलीस प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी दिली आहे. या दोन भावांशिवाय इतर सात जणांचाही मोहम्मद कुटुंबाशी संबंध असून ते या कुटुंबाच्या मित्र परिवारापैकीच होते अशी शक्यता असल्याचे गुणशेखर यांनी सांगितले आहे. सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये स्वत:ला उडवून देणाऱ्या इल्हामला पोलिसांनी आधी एका प्रकरणात अटक केली होती अशी माहिती एक सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये इस्टरच्या सकाळी ब्रेकफास्टच्या रांगेत उभ्या असणाऱ्या इल्हामने स्वत:ला उडवून देत स्फोट घडवला. या दोन्ही भावांपैकी एकजण आधी ब्रिटनमध्ये आणि नंतर मास्टर्सच्या अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियात जाऊन शिक्षण घेऊन परत आला होता अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बुधावारी देशाचे रक्षा राज्यमंत्री रुवन विजयवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती हल्ल्यांमधील अनेक दहशतवादी हे एका श्रीमंत घरातील सदस्य आहेत. श्रीलंका सरकारने चर्च तसेच फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या संघटनेला जबाबादार ठरवले आहे. पोलीस प्रवक्ते रुवन गुनसेखरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार नऊ दहशतवाद्यांनी श्रीलंकेतील वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवले. नऊ आत्मघाती हल्लेखोरांपैकी ८ जणांची ओळख पटली असून नववी व्यक्ती आत्मघाती हल्लेखोराची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वच हल्लेखोर हे उच्चशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत वर्गातील होते. या प्रकरणात आत्तापर्यंत ७० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:04 pm

Web Title: the wealthy spice traders family was involve in sri lanka bombing
Next Stories
1 चीन नमलं, जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केलं मान्य
2 वाराणसीत शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदींकडून उमेदवारी अर्ज दाखल
3 CRPF, BSF, NSG होणार हायटेक; ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक गाड्या
Just Now!
X