जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुमळे संपूर्ण जग बेजार झालेलं असताना, उद्योगधंदे ठप्प झालेले असताना व अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबाघाईला आलेल्या असताना एका देशाची अर्थव्यवस्था मात्र या काळातही अगदी सुसाट असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे करोना महामारीस कारणीभूत असल्याचा ज्या देशावर ठपका ठेवला जात आहे, तोच हा देश आहे. होय सध्या चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याचे दिसून आले आहे.

करोना महामारीस सुरूवात झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झालेला चीन हा पहिला देश ठरला आहे. लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर येथील उद्योगधंदे सुरू झाले व मागील तिमाहित अर्थव्यवस्थेत अनपेक्षितरित्या ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये चीनची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात सावरल्याचे चित्र दिसलं आहे. मागील तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेला करोनामुळे मोठा फटका बसला होता. मागील तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर ६.८ इतका होता. १९६० पासूनचा हा अर्थव्यवस्थावाढीचा सर्वात संथ दर असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

आम्हाला आगामी तिमाहीत निरंतर सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. असं जेपी मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेन्टच्या मार्सेला चाऊ यांनी एका अहवालात म्हटले आहे .

डिसेंबरमध्ये करोना व्हायरस महामारीला सुरूवात झाल्यानंतर अर्थव्यवस्था ठप्प झालेला चीन हा पहिला देश होता व मार्च महिन्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने करोनावर नियंत्रण मिळवण्याचं जाहीर केल्यानंतर अर्थव्यवस्था सावरण्याची प्रक्रिया सुरू करणाराही पहिला देश ठरला.  राष्ट्रीय अर्थव्यवस्था २०२० च्या पहिल्या सहामाहीत मंदीकडून वाढीच्या दिशेने वाढत गेली, असे राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने एका निवेदनात म्हटले आहे.

अर्थतज्ज्ञांच्या मते चीन हा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे व करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या इतिहासातील सर्वात प्रभावी उपाययोजनांमुळे, अन्य देशाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात जलद सुधारणा होणारा देश ठरणार आहे.