भारताच्या संरक्षणविषय धोरणाला जगातील सर्व देशांची मान्यता मिळाली आहे. आता संपूर्ण जगाला मान्य आहे की, अमेरिका आणि इस्रायलनंतर इतर कुठला देश असेल जो आपल्या सीमांचं रक्षण करु शकतो तर तो भारत आहे, असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. रविवारी शाह यांची व्हर्च्युअल सभा पार पाडली, यामध्ये ते दिल्लीतून बोलत होते. यावेळी त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकांचं बिगूल फुंकलं.

शाह म्हणाले, “एक असा काळ होता जेव्हा आपल्या हद्दीत कोणीही घुसू शकत होतं. हद्दीबरोबर छेडछाड करीत होतं. जवानांचे शीर कापले जात होते तेव्हा दिल्लीत कुठलीही संवेदना उमटत नव्हती. मात्र, आमच्या काळात उरी, पुलवामा हल्ले झाले. या काळात मोदींचं सरकार होतं. काही दिवसांतच आम्ही सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकच्या माध्यमातून शत्रूंना त्यांच्या घरात घुसून मारलं. त्यामुळे जगानंही मान्य केलं की, अमेरिका आणि इस्रायलनंतर जर कोणत्या देशात आपल्या सीमांचं रक्षण करण्याची क्षमता असेल तरी भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सीमा सुरक्षित केल्या, अशी अनेक कामं केली ज्यामुळे जगात आपल्याला सन्मान मिळाला.”

दरम्यान, अमित शाहांच्या या व्हर्च्युअल रॅलीला राष्ट्रीय जनता दलानं जोरदार विरोध केला. ‘राजद’च्या नेत्या आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी भांडी वाजवून शाह यांच्या सभेला विरोध दर्शवला. तसेच प्रवाशी मजुरांच्या मुद्द्यांवरुनही त्यांनी केंद्राच्या धोरणांना विरोध केला.