भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM) संमेलनात ते बोलत होते. तसेच, करोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करत आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपुर्तीसाठी आमचे मॅन्युफॅक्चरिंगवर विशेष लक्ष आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत.

तसेच, देशातील उद्योजकांना उद्देशून मोदींनी म्हटले की, मागील १०० वर्षांपासून आपम सर्वजण देशाच्या अर्थव्यवस्थेला, कोट्यावधी भारतीयांचे जीवन सुकर बनण्यासाठी कार्यरत आहात. आता ती वेळ आली, आपल्याला नियोजनही करायचे आहे व त्यावर अंमलबजावणी देखील करायची आहे. आपल्याला प्रत्येक वर्षीच्या प्रत्येक उद्दिष्टास राष्ट्र निर्माणाच्या मोठ्या उद्दिष्टाशी जोडायचे आहे. आता आगामी काळात आत्मनिर्भर भारतासाठी तुम्हाला संपूर्ण ताकद लावायची आहे. या क्षणी जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या रुपात आव्हानं देखील येतील व समाधान देखील असेल.

आपले उद्दिष्ट केवळ आत्मनिर्भर भारतच नाही. तर आपण हे उद्दिष्ट किती लवकर साध्य करू शकतो, हे देखील तितकचे महत्वाचे आहे. येणारी २७ वर्षे ही भारताची जागतिक भूमिकाच निश्चित करणार नाही तर ही आपल्या भारतीयांची स्वप्नं व समर्पणाची देखील परीक्षा पाहातील. ही वेळ भारतीय उद्योग जगाताच्या रुपाने तुमची क्षमता, बांधिलकी व धैर्य जगाला दाखवून देण्याची आहे.