राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश
पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असून प्रत्येकाची ते ‘अवाच्यासव्वा’ दरात विकत घेण्याची क्षमता असेलच असे नाही. त्यामुळे चित्रपटगृहांनी पेयजल नि:शुल्क पुरवायला हवे, असा निर्णय राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्यांमध्ये वृद्ध व आजारी लोक असू शकतात आणि त्यांना तीन तास किंवा त्याहून अधिक काळ पाण्याशिवाय राहणे कठीण होऊ शकते. पाणी ही मनुष्याची मूलभूत गरज असून; चित्रपटगृहाच्या आत पिण्याचे पाणी नेण्याची परवानगी न देणाऱ्या चित्रपटगृहांनी प्रेक्षकांना ते उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे, असे न्या. व्ही.के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
वेळेवर पाणी न मिळाल्यास एखाद्या ग्राहकाला (प्रेक्षक) भोवळ येऊ शकते, त्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी पाणी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. चित्रपटगृहात पाणी नेण्यास मनाई करणाऱ्या मालकांनी सहज वाहून नेता येईल असे पाणी उपलब्ध न करून दिल्यास ती त्यांची सेवा पुरवण्यातील त्रुटी मानली जाईल, असे मत खंडपीठाने नोंदवले.
प्रत्येकाला चढय़ा दरात पिण्याचे पाणी विकत घेणे परवडणारे नसू शकते. बहुतेक वेळा बाहेर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या किमतीपेक्षा अनेकपट किमतीत चित्रपटगृहात मिळते. त्यामुळे पेयजलासारख्या प्राथमिक गरजेसाठी त्याला अवाच्यासव्वा दर मोजावा लागेल. चित्रपटगृहाच्या मालकांनी पाण्याच्या महागडय़ा बाटल्या विकत घेण्यास ग्राहकांना भाग पाडले, तर ती अनुचित व्यापार प्रथा मानली जाईल, असेही खंडपीठाने आदेशात सांगितले.