News Flash

रविशंकर यांच्या कार्यक्रमात शर्विलकांच्या टोळ्यांचा पाहुण्यांना झटका

उत्तर प्रदेश, हरयाणा, तामिळनाडू आणि केरळ येथून आलेल्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

| March 16, 2016 03:00 am

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित केलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना देशातील टोळ्यांनी चांगलाच हात दाखविल्याचे निष्पन्न झाले आहे.

या महोत्सवाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतानाही टोळ्यांनी लॅपटॉप, जडजवाहिर, रोकड असा पाहुण्यांकडील मौल्यवान दस्तऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात ७० एफआयआर नोंदविण्यात आले असून पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, तामिळनाडू आणि केरळ येथून आलेल्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या टोळ्यांमध्ये महिलाही होत्या. या कार्यक्रमाला येण्याची योजनाही या चोरांनी आखली होती, असे उघडकीस आले असल्याची माहिती ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

चोरी आणि दरोडाप्रकरणी पोलिसांनी ७० एफआयआर नोंदविले आहेत. या चोरटय़ांच्या टोळ्यांनी केवळ परदेशी नागरिकांनाच आपला हिसका दाखविला नाही तर कार्यक्रमाच्या संकुलात उभारण्यात आलेल्या ठेल्यांवरही हात मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले त्या दिवशी २० प्रकरणे उघडकीस आली आणि कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणी ३० जणांना कार्यक्रमाच्या ठिकाणाहूनच अटक करण्यात आली असून त्यापैकी काहींना पाहुण्यांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पाकीटमारांची एक टोळीही पकडण्यात आली असून त्यामध्ये केवळ महिलांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. रविशंकर यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाच्या ठिकाणी १२ हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, गुन्हा अन्वेषण आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारीही तैनात करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 3:00 am

Web Title: theft happen in ravishankar programc
टॅग : Ravishankar
Next Stories
1 म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन च्यॉ
2 अल्फागो महासंगणकाकडून दक्षिण कोरियाचा ‘गो’ ग्रँडमास्टर पराभूत
3 भारताशी असलेल्या वैमनस्यातूनच चीन-पाकिस्तान संबंधात वाढ
Just Now!
X