पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या मोराच्या व्हिडिओवरुन काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. मोदींचं अंगणात आलेल्या मोरांवर लक्ष आहे. मात्र, देशातील बेरोजगारांच्या आवाजाकडे लक्ष नाही, अशा आशयाचं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

“उनका ध्यान ‘मोर’ पर है, बेरोजगारी के ‘शोर’ पर नहीं” असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर मोराचा एक व्हिडीओ नुकताच पोस्ट केला होता. त्यात मोदींच्या निवासस्थानी मोर आल्याचं दिसत होतं. निवास्थानी आलेल्या या खास पाहुण्यांची मोदींनी काळजी घेतली. या मोरांना ते दाणे टाकत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसणारा मोर याआधीही पंतप्रधानांच्या घरासमोरील बागेत दिसला आहे.

मोदींनी हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पोस्ट केला आहे. मोदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत मोदींना दाद दिली होती.