बांगलादेशात शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळपर्यंत दहशतवाद्यांनी एका राजनैतिक वर्तुळात लोकप्रिय असलेल्या गुलशन भागातील एका कॅफेमध्ये २० ओलिसांना ठार केल्याच्या घटनेत आयसिसचा संबंध असल्याचा बांगलादेशने इन्कार केला आहे. हा हल्ला देशी इस्लामी दहशतवादी व पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेने केला आहे, असे स्पष्ट करण्यात आले. जमात उल मुजाहिद्दीनने हा हल्ला केल्याचे बांगलादेशच्या तपासयंत्रणांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

गृहमंत्री असदुझमान खान यांनी सांगितले की, हा हल्ला आयसिस किंवा अल कायदाने केलेला नाही तर देशी दहशतवाद्यांचेच हे कृत्य आहे, त्यांनीच परदेशी नागरिकांना ओलिस ठेवले. ओलिस ठेवणाऱ्या हल्लेखोरांना आम्ही त्यांच्या पूर्वजांपासून ओळखतो, कारण ते बांगलादेशातच वाढलेले आहेत. जमातउल मुजाहिद्दीन बांगलादेशचे ते सदस्य आहेत. इस्लामिक स्टेट म्हणजे आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून या हल्लयात एक भारतीय मुलगी व  दोन पोलिस अधिकारी यांच्यासह वीस जण ठार झाले होते. बांगलादेशातील राजनैतिक वर्तुळात लोकप्रिय असलेल्या होली आर्टिसन बेकरीत परदेशी लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. ११ तास त्यांनी कॅफेला वेढा दिला होता. या धुमश्चक्रीत सहा हल्लेखोर मारले गेले तर एक जिवंत सापडला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे २० ते २८ वयोगटातील होते व ते शिक्षित तसेच श्रीमंत घरातील होते. ते सर्व विद्यार्थी होते व बंगाली-हिंदी भाषेत ते बोलत होते. आयसिस किंवा अलकायदाचे बांगलादेशात अस्तित्व असल्याचे बांगलादेशने नेहमी नाकारले आहे. तज्ज्ञांच्या मते निधर्म कार्यकर्ते व अल्पसंख्याक यांच्यावरचे हल्ले आयसिसनेच केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी ठार झालेल्या सहा हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसृत केली आहेत ते कमांडो कारवाईत मारले गेले. सातवा पकडला गेला असून त्याचे जाबजबाब बांगलादेश गुप्तचर खाते घेत आहे. जे पाच बंदुकधारी ठार झाले ते दहशतवादी होते, त्यांची ओळख पटली असून आकाश, बिकाश, डॉन, बांधो व रिपॉन अशी त्यांची नावे आहेत. बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी असे म्हटले आहे की, अमेरिकेच्या साईट या गुप्तचर गटाने छायाचित्र प्रसिद्ध केलेले पाच बंदुकधारी आयसिसचे असल्याचे म्हटले आहे, पण ते जुने शाळकरी मित्र असून त्यांचे ते छायाचित्र समाजमाध्यमावर फार आधीपासून आहे. पाच हल्लेखोरांपैकी तीन जणांना त्यांच्या मित्रांनी ओळखले आहे.

बांगलादेशातील या हल्ल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून दहशतवाद्यांचा कुठल्याही परिस्थितीत बीमोड करण्याचे जाहीर केले आहे. मूठभर दहशतवाद्यांच्या विरोधात आता जनतेने एकत्र यावे असे त्यांनी सांगितले. जे वीस ओलिस ठार झाले त्यात तारूषी जैन या एकोणीस वर्षांच्या भारतीय मुलीचा समावेश होता. मारल्या गेलेल्या वीस ओलिसांपैकी ९ इटालियन, ७ जपानी, १ अमेरिकी बांगलादेशी व दोन स्थानिक लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान ३० लोक जखमी झाले आहेत. आयसिसने अमाक वृत्तसंस्थेच्या मार्फत या हल्ल्याची चार तासानंतर जबाबदारी घेतली आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार होसेन तौफिक इमाम यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने ओलिसांना कोयत्याने गळे चिरून ठार केले त्यावरून ते जमात उल मुजाहिद्दीनचे कृत्य आहे. पाकिस्तानची आयएसआय व जमात यांचे संबंध उघड आहेत, त्यांना सध्याचे सरकार पाडायचे आहे. जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. जे लोक हल्ल्यात मारले गेले त्यांचे गळे चिरलेले होते.

हल्लेखोरांना शस्त्रे पुरवणाऱ्यांचा शोध घेणार – शेख हसीना वाजेद

ढाका -बांगलादेशात हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढतानाच त्यांना स्फोटके व शस्त्रे कुणी पुरवली याचाही छडा लावला जाईल, असे पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळपर्यंत चाललेल्या कॅफेवरील हल्ल्यात वीस परदेशी ओलिसांना ठार करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी त्यांना ११ तास ओलिस ठेवले होते. शेवटी कमांडो कारवाई करण्यात आली. जपानचे परराष्ट्र राज्यमंत्री सेजी किहारा यांनी त्यांची गणभवन या निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी सांगितले, की गुलशन कॅफे येथील हल्ला दुर्दैवी होता, ज्यांनी हल्ला केला त्यांची पाळेमुळे खणून काढली जातील, त्यांना शस्त्रे कुणी पुरवली हे शोधले जाईल.

बांगलादेश सीमेवर ‘हाय अ‍ॅलर्ट’

कोलकाता – ढाक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, त्या देशाला लागून असलेल्या भारतीय राज्यांच्या सीमांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. संशयित अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी करू नये यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) या भागातील गस्त वाढवली आहे. भारतातील पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मेघालय या राज्यांच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर या सीमांवरून भारतात घुसखोरीचे प्रयत्न होऊ शकतात हे लक्षात घेऊन सर्वत्र ‘हाय अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.