शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वाद शमलेला नाही. १० ते ५० वर्षांच्या महिलांच्या प्रवेशावर पूर्वीप्रमाणे बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित आणि पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांच्या प्रवेशाविरोधात सुमारे १९ जनहित आणि पुनर्विचार याचिका दाखल झाले आहेत. मंगळवारपासून यावर सुनावणी सुरु होईल. दरम्यान, सोमवारी रात्री १० पासून ५ दिवसांच्या पुजेनंतर शबरीमला मंदिर बंद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १८ ऑक्टोबर रोजी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते.

स्थानिक लोक आणि धार्मिक संस्था शबरीमला मंदिरात मंहिलांच्या प्रवेशास विरोध करत आहेत. मंदिराचे दरवाजे मागील आठवड्यात ५ दिवसांच्या मासिक पुजेनंतर उघडण्यात आले होते. निलक्कल आणि पम्बा येथे मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. पोलिसांच्या सुरक्षेनंतरही महिलांना दर्शन घेण्यासाठी रोखले जात आहे.

महिलांच्या प्रवेशाविरोधात होत असलेल्या आंदोलनानंतर पम्बा येथे पोलीस दलाने माध्यमांनाही तिथे न जाण्याचे निर्देश दिले आहेत. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु, केरळमध्ये न्यायालयाचा आक्रमकपणे विरोध केला जात आहे.