सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि केंद्र सरकार या तिन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचेही मत व्यक्त केले आहे. तसेच सरकारमध्ये आणि भाजपामध्ये संघाचे कार्यकर्ते आहेत. ते संघाचं ऐकतात मात्र त्यांनी आमच्या मताशी सहमत असावं असं कोणतीही बंधन त्यांच्यावर नाही असे भागवत यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं. सरकारमध्ये संघ आहे ही आणि नाही ही अशीच भूमिका भागवत यांनी यावेळी मांडल्याचे पहायला मिळाले.

स्पर्धा परिक्षांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान उत्सव’ या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात मोहन भागवत यांनी भाजपा, संघ आणि केंद्र सरकार यांच्यामधील फरक स्पष्ट करुन सांगितला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि केंद्र सरकार या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच एकाच्या कृतीसाठी दुसऱ्याला दोषी धरता येणार नाही,” अशी भूमिका भागवत यांनी मांडली. मोदींबरोबर इतर भाजपा नेत्यांवर असणाऱ्या संघाच्या प्रभावाबद्दल बोलताना भागवत यांनी ‘भाजपामध्ये आणि सरकारमध्ये संघाचे कार्यकर्ते असल्याने ते संघाचं ऐकणार. मात्र त्यांनी आमच्या मताशी सहमत असावचं असं काही बंधन नाही. ते त्यांच्या मते आमच्यासमोर मांडू शकतात आणि त्यावरुन चर्चा होऊ शकते,’ असं सांगितलं. भाजपा आणि संघाच्या नात्याबद्दलबही भागवत यांनी मत व्यक्त केले. “भाजपा सत्तेत असल्याने त्यांना प्रत्येक विषयाकडे व्यापक दृष्टीने पहावे लागते. त्यामुळे ते आमच्या मतशी असहमत असू शकतात. जेव्हा एखादा पक्ष केंद्रात सत्तेत येतो तेव्हा राष्ट्रहित हे सर्वात आधी असते हे लक्षात घ्यायला हवे” असं भागवत यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> आरक्षणावर चर्चा व्हायला हवी: मोहन भागवत

दिल्लीमधील महात्मा गांधी मुक्त विद्यापिठामध्ये संघाची संस्था असणाऱ्या ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान उत्सव’ या कार्यक्रमामध्ये भागवत यांनी आरक्षणासंदर्भातही मत व्यक्त केले. आरक्षणाचे समर्थन करणाऱ्यांमध्ये आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांमध्ये संवाद व्हायला हवं असं मत भागवत यांनी व्यक्त केले.