पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक आणि दहशतवादी होण्याच्या काठावर असून जर परिस्थिती नीट हाताळली नाही तर हा देश म्हणजे स्टिरॉइड घेतलेला इराण किंवा उत्तर कोरिया होईल असं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटलं आहे. जॉन बोल्टन या आंतरराष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तिची या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना जितक्या जोमानं पाकिस्तानवर तुटून पडायचंय तितकी घाई बोल्टन यांना नसल्याचं बोललं जातं. याबाबत एका मुलाखतीत बोलताना बोल्टन म्हणाले, की पाकिस्तानवर त्वेषानं तुटून पडलं तर अण्वस्त्र असलेला पाकिस्तान कट्टर इस्लामिक व दहशतवादी बनेल आणि त्याची अवस्था स्टिरॉईड घेतल्यामुळे हाताबाहेर गेलेल्या इराणसारखी बनेल. त्यामुळे पाकिस्तानशी सक्तीनं वागताना संतुलन राखावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे.

अफगाणिस्तानसंदर्भात धोरण जाहीर करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांना आसरा देण्याचं ताबडतोब बंद केलं पाहिजे अशी सक्त ताकीद दिली होती. तर बोल्टन म्हणाले की, तालिबानला अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा करता यायला नको हे अमेरिकेचं उद्दिष्ट्य असून कुणाला आवडो न आवडो त्यासाठी पाकिस्तानचं सहाय्य आवश्यक आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षांना पाकिस्तानवर प्रचंड दबाव टाकायचा आहे हे उघड आहे, याच्याशी मी सहमत आहे आणि ओबामांनी तितका दबाव ठेवला नाही हे ही खरं असल्याचं बोल्टन म्हणाले. बोल्टन म्हणाले, “पाकिस्तानवर आम्ही इतका दबाव टाकणार आहोत की ते तालिबान, हक्कानी नेटवर्क, गुलबुद्दिन हिकमती आदींना पाकिस्तानमधल्या सुरक्षित जागांमधून हुसकावतील नी अफगाणिस्तानात हाकलतील. त्यांची सगळी रसद बंद करतील तसेच त्यांना शस्त्र व पैसे देणं बंद करतील.”

मात्र यात एक समस्या असल्याचं सांगताना ते पुढे म्हणाले की असं केल्यावर दुसरा एक धोका आहे तो म्हणजे अमेरिकाविरोधी वातावरण तयार होईल ज्यामुळे कट्टर इस्लामिकतेला खतपाणी घालेल आणि पाकिस्तान हाच एक दहशतवादी देश बनेल. पाकिस्तानच्या लष्करातही कट्टर इस्लामिकांचा भरणा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांनी जर पाकिस्तान सरकारचा पूर्ण ताबा घेतला तर अण्वस्त्रधारी पाकिस्तान किती मोठा धोका बनेल असा प्रश्न उपस्थित करत बोल्टन यांनी थोडं दमानं घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. अन्यथा पाकिस्तान स्टिरॉइड घेतलेला इराण अथवा उत्तर कोरिया बनण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले.