द्विपक्षीय प्रश्न असल्याचे मत, भारत-पाकिस्तानला चर्चेचे आवाहन

वॉशिंग्टन : काश्मीरबाबतच्या धोरणात कुठलाही बदल झाला नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले असून दोन्ही देशांनी संयम पाळून एकमेकांशी संवादातून मतभेद दूर करावेत असे म्हटले आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ओरटॅगस यांना अमेरिकेच्या काश्मीर धोरणात बदल झाला आहे काय असे विचारले असता त्या म्हणाल्या की, असा कुठलाही बदल  झालेला नाही. पूर्वीचेच धोरण कायम असून काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असून तो दोन्ही देशांनी चर्चेच्या मार्गातून सोडवावा असेच अमेरिकेचे धोरण आहे.

जरी अमेरिकेच्या काश्मीर धोरणात बदल झाला असता तरी तो मी येथे जाहीर केला नसता पण तसा बदल करण्यात आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या की, भारत व अमेरिका यांनी एकमेकांशी संवाद साधावा व त्यातून प्रश्न सोडवावेत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे एक अधिकारी पुढील आठवडय़ात ठरल्याप्रमाणेच दिल्लीला जात आहेत. आम्ही संबंधित देशांना शांतता पाळून संयमाचे आवाहन केले आहे. दक्षिण आशियातील या दोन्ही देशांशी आम्ही सहकार्याने काम करीत आहोत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान येथे येऊन गेले ते केवळ काश्मीरसाठी आले नव्हते. पण काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचा पाठपुरावा करावा लागेल. भारत व पाकिस्तान यांच्यासमवेत आम्ही अनेक प्रश्नांवर काम करीत आहोत.

काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप इम्रान खान यांनी केल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की,  आपण या पलीकडे जाऊन काही बोलू शकत नाही. कारण हे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. संबंधित देशांशी आम्ही संपर्कात आहोत.

जगात कुठेही तणाव निर्माण झाला तर अमेरिकेने तेथील लोकांना नेहमीच कायद्याचे राज्य पाळून मानवी हक्कांचे व आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर परराष्ट्र खाते बारीक लक्ष ठेवून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांची स्थानबद्धता व निर्बंध याबाबतच्या बातम्या आल्या आहेत.

अनुच्छेद ३७० रद्द करताना अमेरिकेशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती.

अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशिया मंत्री अलाइस वेल्स या भारतात येत असून उपपरराष्ट्रमंत्री जॉन के सुलीवान हे ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्टच्या दौऱ्यात भारताला भेट देणार आहेत.

भारत-पाकिस्तान यांनी संवादातून मतभेद मिटवावे – चीन

बीजिंग : भारत व पाकिस्तान यांनी त्यांच्यातील वाद हे संवाद व वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवावेत, असे चीनने शुक्रवारी म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यासाठी चीनच्या पाठिंब्याकरिता चीनमध्ये आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यासाठी चीनचा पाठिंबा मिळवण्याकरिता कुरेशी हे चीनमध्ये आले असून चीनचे पाकिस्तानातील राजदूत लिजियान झाओ यांनी ट्विटर संदेश पाठवला होता. त्यात  कुरेशी हे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी व इतर चिनी नेत्यांना भेटणार आहेत असे म्हटले होते. अगदी कमी कालावधीत कुरेशी यांची चीन भेट ठरली.  भारत व पाकिस्तान यांच्यात अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने अनुच्छेद ३७० रद्द करण्याचे भारताचे कृत्य हे एकतर्फी व बेकायदा असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानने भारताबरोबरचे राजनैतिक संबंधही तोडले असून उच्चायुक्तांना माघारी पाठवले आहे. पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडल्याबाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनने पाकिस्तानच्या संबंधित कृतींची दखल घेतली आहे. दोन्ही देशांनी संवाद व वाटाघाटीच्या मार्गाने वाद मिटवावेत अशी चीनची भूमिका आहे.  संबंधित देशाने जम्मू-काश्मीरचा दर्जा एकतर्फी बदलण्याचे थांबवून तणाव टाळावा. यात त्यांनी भारत व अनुच्छेद ३७० यांचा थेट उल्लेख केला नाही.

भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेश करून त्याचे सार्वभौमत्व धोक्यात आणल्याची टीका चीनने आधीच केली होती.

जयशंकर चीनला जाणार

दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे ११ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात असून ते त्यांचे समपदस्थ वँग यी यांच्याशी व्यापक मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. भारत-चीन माध्यम मंचाच्या बैठकीस ते १२ ऑगस्टला उपस्थित राहणार असून लोक पातळीवरील विनिमय व्यवस्थेच्या माध्यमातूनही चर्चा करणार आहेत.