दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सहभागी असल्याचा आरोप असलेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांनी गुरुवारी या खटल्यातील साक्षीदारांवर शाब्दिक हल्ला चढविला. माझ्याविरुद्ध साक्ष देणारे साक्षीदार खोटं बोलत आहेत आणि त्यांची ही साक्ष विश्वासार्ह नाही, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.
 शीखविरोधी दंगलीत टायटलर यांचा सहभाग नव्हता, या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अहवालाला केराची टोपली दाखवत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच झालेल्या तीन शिखांच्या हत्येप्रकरणी टायटलर यांची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले होते. या पाश्र्वभूमीवर टायटलर यांनी दावा केला की सुरिंदर सिंग आणि जसबीर सिंग या साक्षीदारांनी दिलेल्या जबानीनुसार न्यायालयाने काल हा निर्णय दिला, मात्र सुरिंदरने आपली साक्ष पाचवेळा बदलली आहे, त्यामुळे या साक्षी विश्वासार्ह नाहीत, तसेच इंदिराजींची हत्या झाल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मी त्यांच्या पार्थिवाजवळ होतो, दूरदर्शनच्या चित्रीकरणातही हे सिद्ध होत आहे, त्यामुळे तीन शिखांची हत्या झाली, त्या ठिकाणी मी कसा असून शकेन, तरीही कोणत्याही चौकशीस मी तयार आहे.
हे दंगे काँग्रेसपुरस्कृत -भाजप
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेला शीखविरोधी दंगा हा काँग्रेसपुरस्कृत होता, असा आरोप भाजपने गुरुवारी केला. मोठय़ा वृक्षाच्या पतनानंतर जमीन हादरतेच, असे वक्तव्य राजीव गांधी यांनी केले होते. त्यांचे हे विधान गंभीर होते. ज्या दंगलीत हजारो शिखांना प्राण गमवावे लागले, त्याबद्दल गांधी परिवाराने आतापर्यंत शिखांची माफी मागितलेली नाही, तसेच गेली २८ वर्षे गांधी परिवाराने या प्रश्नी मौनच बाळगले आहे. शीखविरोधी दंगली या गांधी परिवाराच्या संमतीने काँग्रेसनेच घडवून आणल्या, असा आरोप भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी केला.