५६ दिवसांच्या सुटीनंतर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये परतले. त्यांच्या परतण्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे देशातील सत्ताधारी भाजपने राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर टीका केली. राजकारणामध्ये ‘आयटम नंबर’ नसतो, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसला लगावला.
ते म्हणाले, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाचा नेता इतके दिवस सुटीवर गेला. आता त्यांच्या परतण्याने कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसते आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस शेतकरी मोर्चा काढणार आहे. मात्र, राजकारणात असा ‘आयटम नंबर’ नसतो. एखाद्या कार्यक्रमाला यायचे आणि परत निघून जायचे. राजकारणात सातत्याने लोकांसोबत राहावे लागते, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली.