16 October 2019

News Flash

‘नेता आणि नीती नसणाऱ्या विचारधारेला मतदान करु नका’

मोदी सरकारने काय काय केले याचा पाढाच अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात वाचला

नेता आणि नीती नसणाऱ्या विचारधारेला मतदान करु नका असे आवाहन करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मोठ्या संख्येने मतदान करा असे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये नेतृ्त्त्वाचा एकही चेहरा नाही असेही शाह यांनी म्हटले आहे. २०१९ ची निवडणूक ही एक लढाई आहे. ती भाजपाने जिंकली तरच देशाचे भले होईल असेही शाह यांनी म्हटले आहे. तसेच तरुण वर्गाने आणि गरीबांनी भरभरून मतदान करावे असेही आवाहन त्यांनी केले.

पानिपतच्या लढाईचे उदाहरण अमित शाह यांनी दिले. पानिपतची लढाई मराठे हरले आणि देश २०० वर्षे मागे गेला. आजची वेळ तशीच अटीतटीची आहे. तुम्ही नेता आणि नेतृत्त्व नसलेल्या पक्षाला मतदान केलेत तर देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल. त्यांनी (काँग्रेस) देशावर ७० वर्षे राज्य केले मात्र देशाची प्रगती काहीहीह केली नाही अशीही टीका शाह यांनी केली. देशाचा विकास, देशाचे गौरव हे गेल्या पाच वर्षात वाढले आहे. २०१४ मध्ये भाजपाकडे ६ राज्यांचे सरकार होते. आता २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपाकडे १६ राज्यांची सत्ता आहे. हा पक्ष गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता पुन्हा एकदा देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना निवडून द्या असे आवाहनही अमित शाह यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगप्रसिद्ध नेते आहेत. त्यांच्या मागे आपल्या देशाची जनता एखाद्या पर्वतासारखी उभी आहे. या जनतेच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल असाही विश्वास शाह यांनी व्यक्त केला. महाआघाडी असो की काँग्रेस सगळ्यांना पुन्हा एकदा हरवण्याची वेळ आली आहे असेही शाह यांनी म्हटले आहे.

आपल्या भाषणात अमित शाह यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी शाहू महाराज यांच्या नावांचाही उल्लेख केला. रामलीला मैदानात भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे, याच अधिवेशनात अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

 

First Published on January 11, 2019 4:41 pm

Web Title: there is no leader as popular as narendra modi in the entire world says amit shah in delhi