राजद्रोहाचा कायदा हा वसाहतवाद्यांनी अर्थात इंग्रजांनी तयार केला होता. आपल्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी हा कायदा त्यांनी आणला होता. मात्र, आजच्या घडीला याची आवश्यकता नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.


दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) कथीत देशविरोधी घोषणाप्रकरणी अखेर तीन वर्षांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. जवळपास १२०० पानांच्या आरोपपत्रात १० मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासह, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांचाही समावेश आहे. कन्हैय्या कुमारनेही देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, त्याला संबंधित कार्यक्रमाची आधीपासून कल्पना होती असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच घोषणाबाजी करतानाचा कन्हैय्या कुमारचा व्हिडीओ देखील मिळाला असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सिब्बल पुढे म्हणतात, आज अनेक लोक सरकारविरोधात ट्विटद्वारे किंवा इतर माध्यमांवरून बोलतात. त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. अशा प्रकारे केंद्र सरारकडून या कायद्याचा गैरवापर केला जात आहे. याद्वारे जनतेवर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.