राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आम्हाला मान्य नाही, त्यांच्याशी आम्ही अजूनही संघर्ष करीत आहोत, त्यामुळे या विचारधारेबाबत आमच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेची शक्ती वाढत आहे. त्यामुळे ज्यांचा सेक्युरॅलिझमवर विश्वास आहे त्यांनी ही शक्ती रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जो विचारच आम्हाला मंजूर नाही त्याच्याविरोधात भुमिकेसाठी आम्हाला कमिटमेंट देण्याची गरज नाही, त्यांच्याशी आमचा कायमच संघर्ष राहणार आहे, अशा शब्दांत पवारांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नाला उत्तर दिले. तसेच त्यांना आघाडीत येण्याचे छुपे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रात सत्तेत आल्यास राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची हमी दिली तरच काँग्रेसशी समझोता करण्याची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आंबेडकर यांनीच या संदर्भातील मुसदा सादर करावा, आम्ही त्याला मान्यता देऊ, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना दिले होते. या पार्श्वभूमीवर पवारांनी आपल्या पक्षाची भुमिका स्पष्ट केली. जर समविचार पक्ष एकत्र येणार असतील तर या भुमिकेवर सर्वांनी एकत्र यायला काहीही हरकत नाही. आमच्यासह सहकारी पक्षांनी असा जाहीर विचार घेऊन पुढे येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय पातळीवर समविचारी पक्षांना एकत्र करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी संबंधितांना आघाडीत घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये देश पातळीवर चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि मी प्रयत्न करीत आहोत, असे ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत यापूर्वीही आमची चर्चा झाली. दिल्लीत झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांची भुमिका अत्यंत समंजसपणाची होती. त्यामुळे आघाडीत त्यांना जागा देण्याबाबत दोघांना मान्य असेल तो तोडगा निघेल अशी आशीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.