महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे सध्या देशात वादळ उठले आहे. पीडित महिला आपल्यासोबतही लैंगिक शोषण झाल्याचे #MeToo या मोहिमेद्वारे मोठ्या धैर्याने उघड करीत आहेत. या मोहिमेचे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनीही स्वागत केले असून भारतात या मोहिमेला सुरुवात झाल्याने त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बालकांवरील लैंगिक शोषणप्रकरणातील पीडितांना तक्रार दाखल करण्यासाठी १०-१५ किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांचा कालावधी देण्यात यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

मनेका गांधी म्हणाल्या, देशात मीटू मोहिम सुरु झाल्याने मी अत्यंत आनंदी आहे. मात्र, मी आशा करते की या मोहिमेला स्वैर स्वरुप येऊ नये, ती नियंत्रणातून बाहेर जाता कामा नये. महिलांनी आपल्याला ज्या लोकांनी अपमानित केलंय अशांना लक्ष करु नये. काही गोष्टींसाठी महिलाही जबाबदार असतात. मात्र, लैंगिक शोषणाविरोधातील त्यांचा राग कधीही जात नाही.

ज्या व्यक्तीने आपल्यासोबत असे कृत्य केले त्या व्यक्तीला आपण नेहमीच लक्षात ठेवतो. त्यामुळेच आम्ही कायदा मंत्रालयाला सांगितले आहे की, या संदर्भातील तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसावे. त्यामुळे पीडित महिला आता १०-१५ वर्षांनंतरही याबाबत तक्रार दाखल करु शकतात. त्यामुळे तुम्हाला तक्रारीसाठी मार्ग खुला झाला आहे, असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी गांधी यांनी सांगितले होते की, बाल शोषणाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवण्यात यावी. त्यामुळे १८ वर्षांनंतरही पीडित व्यक्ती अशी तक्रार दाखल करु शकते. सुरुवातीला मंत्रालयाने यासंदर्भात तक्रार दाखल करण्याची वेळ मर्यादा ७ वर्षांची ठेवली होती. मात्र, सर्व बाबींवर विचार करुन ही मर्यादा कमी किंवा जास्त ही होऊ शकते.