पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ‘सिंडिकेट राज’ चिरस्थायी केले असून, ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही, असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आपल्या मतपेढीचे संरक्षण करण्यासाठी तृणमूल काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असून, आपला सांस्कृतिक वारसा व मानचिन्हे याकडे दुर्लक्ष करत आहेत, असाहीआरोप मोदी यांनी केला.

‘राज्य सरकारच्या कट मनी संस्कृतीने वातावरण इतके दूषित केले आहे, की पैसा दिल्याशिवाय तुम्ही घर भाडय़ानेही घेऊ शकत नाही..सिंडिकेटच्या परवानगीशिवाय तुम्हाला घर भाडय़ाने घेता येऊ शकत नाही’, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी व आयुष्मान भारत यांच्यासारख्या केंद्राच्या योजनांना परवानगी नाकारून शेतकरी व गरीब यांना त्यांच्या फायद्यांपासून वंचित ठेवल्याबद्दल मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला.

हुगळी येथील सभत मोदी म्हणाले की, ‘‘बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ज्या घरात जन्माला आले व जेथे त्यांनी ‘वंदे मातरम’ लिहिले, ते घर वाईट अवस्थेत असल्याचे मला कळले. सर्वत्र गुलामीचा अंधकार पसरला असताना ज्या माणसाने स्वातंत्र्य संग्रामात नवा जीव ओतला, त्याचे घर उपेक्षेचे बळी ठरले आहे..हा बंगाली अस्मितेचा अपमान आहे.’’

‘आसाम, ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसचे दुर्लक्ष’

ढेमजी (आसाम) : देशातील काँग्रेसच्या सरकारांनी आतापर्यंत आसाम आणि ईशान्येकडे अनेक दशके दुर्लक्ष केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला. आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून मोदी एक महिन्यात तिसऱ्यांदा राज्याच्या दौऱ्यावर आले होते.

पेट्रोलियम क्षेत्रातील ३२२२ कोटींहून अधिकचे तीन मोठे प्रकल्प मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे सरकार आणि केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत राज्याच्या संतुलित विकासासाठी जी पावले उचलली त्याचा मोदी यांनी उल्लेख केला.

मोदी यांच्या हस्ते ढेमजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तर सुअलकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते पार पडला.

यापूर्वी ज्यांनी अनेक दशके राज्य केले त्यांना दिसपूर ते दिल्ली हे अंतर मोठे वाटत होते, मात्र दिल्ली आता दूर नाही, तुमच्या दरवाज्यात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वीच्या सरकारने राज्याला सावत्र वागणूक दिली आणि संपर्कता, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले, असेही मोदी म्हणाले.