अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायी चालणाऱ्या मजुरांची क्रूर थट्टा केली आहे अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. सध्याच्या घडीला लाखो गरीब मजूर रस्त्यावर आहेत. हे मजूर भुकेलेले आहेत. अनेकजण त्यांच्या घरी जाण्यासाठी शेकडो किमी. चालत आहेत. अशा लोकांसाठी अर्थमंत्र्यांनी काहीही तरतूद केलेली नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

आज ज्या काही तरतुदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या आहेत त्यात गरीबांचा विचार कुठे केला आहे? देशातली १३ कुटुंबं ही निराधार झाली आहे. त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभं आहे. अशांना मदतीसाठी आज काहीही अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केली नाही. गरीबांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी काही तरतुदी जाहीर केल्या. तसंच इतर क्षेत्रांसाठीही काही तरतुदी जाहीर केल्या.मात्र यामध्ये पायी चालणाऱ्या मजुरांसाठी, गरीबांसाठी काहीही नव्हतं अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यातल्या काही तरतुदी आज निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या. पुढचे दोन दिवसही त्या इतर तरतुदी सांगणार आहेत. या पॅकेजमध्ये गरीब, मजूर, शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत गरीब, मजुरांसाठी काहीही तरतूद नव्हती असं म्हणत चिदंबरम यांनी टीका केली आहे.