सरसंघचालक मोहन भागवत यांचे विचार

नवी दिल्ली : हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.

विविधतेत एकता मानून सर्वाचा सर्वागीण विकास साधणे हे हिंदुत्वाचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे इथला मुस्लीम हिंदुत्वाला वज्र्य नाही. ‘हिंदुत्व’ असा शब्द वापरायचा नसेल तर नका वापरू, ‘भारतीय’ म्हणा. पण या शब्दाला संघाचा विरोध नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

आधुनिक भारत हा राज्यघटनेवर आधारलेला असून देशातील प्रत्येक नागरिक घटनेला बांधला गेलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील राज्यघटनेला श्रेष्ठ मानतो आणि त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशी विचारांचा आधार घेऊन राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा समावेश केलेला नाही. हा विचार त्यांना भारताच्याच भूमीतून, बुद्धाच्या विचारातून मिळालेला आहे. कोणीही शत्रू नसून प्रत्येकाला बरोबर घेऊन मानवविकासाचा हा विचार आहे आणि याच मूल्यांचा संग्रह म्हणजे हिंदुत्व असल्याचा दावा भागवत यांनी केला.

‘भविष्यातील भारत’ या विषयावरील तीनदिवसीय व्याख्यानमालेतील दुसरे भाषण भागवत यांनी मंगळवारी केले. त्यात संघासाठी हिंदुत्व म्हणजे काय, याचा अर्थ भागवत यांनी स्पष्ट केला. विदेशात राष्ट्र आणि राज्य संकल्पना वेगवेगळ्या केलेल्या आहेत. भारतातही राज्ये बदलली पण राष्ट्र एकच राहिले असून त्याला आपण ‘सांस्कृतिक राष्ट्र’ मानतो. हिंदू ही निव्वळ धर्मसंकल्पनाही नाही, ती जीवनदिशा आहे.

भारतीय परंपरेत धर्म हा शब्द ‘धर्मशास्त्रा’पुरता मर्यादित नाही, तो मानवधर्म या अर्थाने वापरला जातो. इंग्रजीत भाषांतर करताना त्याला ‘रिलिजन’चे मर्यादित स्वरूप येते. म्हणजे पूजापाठ, कर्मकांड, मसीहा वगैरे अर्थाने ‘रिलिजन’ हा शब्द वापरला जातो. पण हिंदुत्वाचा धर्म म्हणजे विश्व हे कुटुंब. या संकल्पनेमुळेच प्रत्येक आक्रमणातून आलेली संस्कृती भारताने स्वीकारली. प्रत्येकाला सामावून घेण्याच्या मूल्यामुळे विदेशात हिंदुत्वाचा अर्थ समजावून सांगताना धर्मपरिवर्तनाचा अट्टहास धरला नाही, अशी मांडणी भागवत यांनी केली.

राष्ट्रनीतीवर बोलणारच!

संघाचा प्रभाव वाढत असल्याने राजकारणाशी निगडित मुद्दय़ांबाबतही प्रभाव वाढला. मात्र, राजकारणात विविध पक्ष, त्यांची परस्परविरोधी मते असतात. संपूर्ण समाजाला जोडायचे असेल तर ‘राजकीय’ क्षेत्राच्या बाहेर राहूनच काम करावे लागते. त्यामुळे संघ राजकारण करीत नाही. संघाला कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत. पण राष्ट्रनीतीचा परिणाम देशातील सर्वावर होत असतो. त्यामुळे राष्ट्रनीती काय असावी यावर संघ विचार मांडणारच. म्हणूनच घुसखोरांच्या विषयावर संघाने उघडपणे मत व्यक्त केले आहे, असे स्पष्टीकरण भागवत यांनी दिले.

सत्ताकेंद्र एकच

देशाचे सत्ताकेंद्र दिल्लीतच असून ते नागपूरवरून चालवले जात नाही. पंतप्रधानांना वा केंद्र सरकारमधील मंत्र्यांना नागपूरवरून फोन करून राजकीय धोरणांवर अंकुश ठेवला जात नाही, असा दावा भागवत यांनी केला. स्वयंसेवकांनी कोणत्या राजकीय पक्षात जाऊन काम करायचे हे त्यांनी ठरवावे, पण ते अन्य पक्षांत जात नाहीत. ते का येत नाहीत याचा त्या पक्षांनी विचार करावा, असा ‘उपदेश’ भागवतांनी बिगरभाजप पक्षांना केला.

महिलांना बरोबरीचेच स्थान

स्त्रीला शक्तीरूप मानले असले तरी देशात आचार आणि आचरण यात फरक दिसतो. अनेक बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सशक्त असल्याचे दिसते. तिला बरोबरीचे स्थान द्या, असे भागवत म्हणाले.