News Flash

जुन्या नोटा बाळगल्यास तुरुंगवास नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

किमान १० हजार रुपये दंड

संग्रहित छायाचित्र

बाद झालेल्या जुन्या नोटा बाळगल्यास तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाद झालेल्या जुन्या नोटा बाळगणे हा गुन्हा ठरवण्यात आला होता. त्यामध्ये आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद असल्याची चर्चा होती. मात्र गुरुवारी सरकारने तुरुंगवास होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बाळगणे हा गुन्हा ठरवण्यात आला होता. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील वटहुकूम जारी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. हा वटहुकूम लवकरच राष्ट्रपतींकडे पाठवला जाणार आहे. या वटहुकूमानुसार बाद चलनातील १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाळगणा-यास किमान १० हजार रुपये दंड किंवा बाळगलेल्या रकमेची पाचपट दंड यातील जी रक्कम अधिक असेल तितके भरावे लागणार आहे. या प्रकरणात चार वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आल्याची चर्चा होती. यावर अनेकांनी आक्षेपही घेतला होता. गुरुवारी केंद्र सरकारने तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणातील किमान दंड १० हजार रुपये असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस नोटांच्या काळ्या धंद्यासह दहशतवाद्यांना होणाऱ्या पैशांचा पुरवठा रोखता यावा, यासाठी नोटाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होती असली तरी हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. नोटाबंदीनंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या वसुलीतही मोठी वाढ झाल्याचा सरकारचा दावा आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजारच्या सुमारे १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्याचे समजते. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचे मोदींनी म्हटले आहे. तर विरोधकांनी नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणी असल्याची टीका केली आहे. मोदींनी ५० दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र अजूनही चलनकल्लोळ कायम आहे. त्यामुळे आता मोदी राजीनामा देणार का असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 6:33 pm

Web Title: there will be no jail term for holding old notes says finance ministry
Next Stories
1 ‘हे’ कारण देऊन आरबीआयने नोटाबंदीची माहिती देण्यास दिला नकार
2 कलमाडींनंतर चौटालाही भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन अध्यक्षपद सोडण्यास तयार
3 नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष करात १३.६ टक्क्यांची वाढ- अरूण जेटली
Just Now!
X