‘ब्रेग्झिट’च्या पार्श्वभूमीवर स्वपक्षीय खासदारांकडून अविश्वास ठराव

ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा या वादग्रस्त ब्रेक्झिट समझोत्यावरून अडचणीत आल्यानंतर आता त्यांच्याच हुजूर पक्षाच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला असून सर्व ताकदीनिशी त्याला सामोरे जाण्याचा निर्धार मे यांनी व्यक्त केला आहे.  थेरेसा मे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या ४८ खासदारांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडला आहे.

मे यांनी डाउनिंग स्ट्रीट येथे सांगितले, की नेतृत्व बदलामुळे ब्रेक्झिटला उशीर होईल किंवा ती प्रक्रिया रद्द होईल. इंग्लंडने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केल्यानंतर जून २०१६ मध्ये थेरेसा मे पंतप्रधान झाल्या. त्यांच्या पक्षाच्या ब्रेक्झिट योजनेवर बरीच टीका झाली आहे. मे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते आवश्यक आहेत. काही बातम्यांनुसार १४७ खासदारांनी जाहीरपणे असे सांगितले, की आम्ही थेरेसा मे यांच्या बाजूने मतदान करणार आहोत. त्यात अनेक कॅबिनेट मंत्री त्यांच्या समर्थनार्थ धावून आले आहेत.

अविश्वास ठराव संमत झाला, तर पक्षाला नवीन नेत्याची निवड करावी लागेल व तो नवीन पंतप्रधान असेल. त्यात माजी परराष्ट्रमंत्री बोरिस जॉनसन, परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट, गृहमंत्री साजिद जाविद, पेन्शनमंत्री अंबर रूड यांची नावे पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहेत. पण ब्रेक्झिटवादी व ब्रेक्झिटविरोधी उमेदवाराबाबत मतैक्य नाही. जर मतभेद झाले तर मतदानाच्या फेऱ्या घेऊन नेता निवड केली जाईल.

आपल्या सरकारी निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मे म्हणाल्या, मी माझ्या सर्व ताकदीनिशी या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहे. पंतप्रधानपदी नव्या व्यक्तीची निवड केली तर २९  मार्चला होणारे  ब्रेक्झिट रखडण्याची किंवा ते रद्दच केलं जाण्याची शक्यता आहे.

हुजुर पक्षाचा नेता बदलल्यामुळे आपल्या देशाचं भवितव्यच धोक्यात येऊन अनिश्चिततेचं वातावरण तयार होईल, ही परिस्थिती  देशाला परवडणार नाही असेही त्या म्हणाल्या.