देशभरात सध्या करोनाचा कहर सुरु आहे. गेल्या एका वर्षाहून अधिक काळापासून करोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता देशातल्या दहावी आणि बारावी बोर्डांच्या परीक्षाही अनेक राज्यांनी रद्द केल्या आहेत. जाणून घेऊ याबद्दल सविस्तर…..

केंद्राचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय…..


करोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यापाठोपाठ ‘सीआयएससीई’नेही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. राज्य मंडळाने किंवा राज्याच्या शिक्षण विभागाने बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 परीक्षा रद्द…..योगी सरकारचा निर्णय…


विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता हे सर्वात जास्त महत्त्वाचं असल्याचं सांगत उत्तर प्रदेश सरकारनेही या शैक्षणिक वर्षातल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे.

गुजरात सरकारनेही रद्द केल्या परीक्षा…

केंद्राच्या निर्णयानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा- वेळापत्रक जाहीर केल्यानंतर २४ तासातच १२वीच्या परीक्षा रद्द! गुजरात बोर्डाचा निर्णय!

राजस्थान सरकारनेही घेतला निर्णय….

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

आणखी वाचा- बारावीच्या परीक्षांबाबत अजूनही निर्णय नाहीच! मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेवर शिक्षणमंत्री म्हणतात…!

महाराष्ट्र सरकार अद्याप विचाराधीन…..


काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. मात्र, निर्णय झाला नाही. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”.