आमच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. दोन्ही हात देखील बांधून ठेवण्यात आले. त्यांच्या हातात एके-४७ बंदुका असल्याचे नंतर आम्हाला समजले. त्यावेळी माझ्या हातात शस्त्रे असती, तर मी दहशतवाद्यांशी लढलो असतो आणि शहिदही झालो असतो, असे गुरूदासपूरचे अपहृत पोलीस अधिक्षक सलविंदर सिंग यांनी सांगितले. पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सलविंदर सिंग यांचे अपहरण केले होते. पठाणकोटवरून गुरूदासपूरकडे जात असताना सलविंदर सिंग यांची गाडी रोखून दहशतवाद्यांनी सलविंदर यांचे हात-पाय बांधले होते. सलविंदर म्हणाले की, माझ्या गाडीवर निळा दिवा होता. पण गणवेश परिधान केला नसल्याने मी लष्करी अधिकारी असल्याचा अंदाज दहशतवाद्यांना आला नाही. दहशतवाद्यांकडे एके-४७ बंदुका होत्या. ते उर्दू आणि हिंदी भाषेत बोलत होते. त्यांनी माझा मोबाईल आणि गाडी घेऊन पोबारा केला. पण गाडीत ठेवलेला भोंगा पाहून मी लष्करी अधिकारी असल्याची कल्पना त्यांना आली आणि मला ठार करण्यासाठी ते पुन्हा मागे आले. तोपर्यंत माझे बांधलेले हात मी मोकळे करुन निसटण्यात यशस्वी झालो.
दरम्यान, सलविंदर यांचे अपहरण झाले त्यावेळी आणखी दोन जण त्यांच्यासोबत होते. एनआयएच्या अधिकाऱयांनी काल सलविंदर यांची सहातास कसून चौकशी देखील केली. आजही सलविंदर आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या दोघांची चौकशी होणार आहे. हल्ला झालेल्या पठाणकोटच्या हवाई तळापासून सलविंदर यांची गाडी ५०० मीटर अंतरावर सापडली होती.