उत्तर प्रदेशात एका १३ वर्षीय दलित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच राज्यात आणखी धक्कादायक घटना घडली आहे. उच्च जातीतील व्यक्तींनी दलित सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली. सरपंचाने ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचं सरपंचाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या घटनेचे गावात पडसाद उमटले. संतप्त जमावानं दगडफेक करत जाळपोळ केली. त्याचबरोबर पोलीस चौकीचीही तोडफोड करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये मागील दोन दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आझमगढमधील बांसगावमध्ये एका मागास समुदायातील सरपंचाची उच्च जातीतील व्यक्तींनी हत्या केल्याची घटना घडली आहे. ४२ वर्षीय सत्यमेव जयते हे बांसगावची सरपंच होते. ते पहिल्यांदाच बांसगावचे सरपंच झाले होते. त्यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली.

मागास समुदायातील व्यक्तींनी असा आरोप केला आहे की, “सत्यमेव जयते यांची ठाकूर समुदायातील व्यक्तींनी हत्या केली. ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास सत्यमेव जयते यांनी नकार दिल्यानं ही हत्या करण्यात आली,” असं आरोपात म्हटलं आहे. बांसगावमध्ये उच्च जातींच्या तुलनेत मागास जातीतील लोकांची संख्या पाच टक्क्यांनी जास्त आहे. पण, उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच गावातील कारभाराची सूत्र ब्राह्मण व ठाकूर यांच्या हातात असल्याचं सांगितलं जातंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यमेव जयते हे हत्या झाली त्यादिवशी गावाबाहेर असलेल्या एका खासगी शाळेसमोरून जात होते. त्याचवेळी त्यांना त्यांचे मित्र विवेक सिंह आणि सूर्यांश दुबे हे जेवणासाठी जवळचं जेवणासाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सत्यमेव जयते यांची त्यांच्या मित्रांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आरोपींनीच सत्यमेव यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि फरार झाले.

या घटनेनंतर गावातील दलित समुदायातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन संताप व्यक्त केला. याला हिंसक वळण मिळालं. यावेळी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. यात आठ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेविषयी बोलताना आझमगढ क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुभाष चंद्र दुबे म्हणाले, “जोपर्यंत आरोपींनी अटक करून चौकशी केली जात नाही. तोपर्यंत सत्यमेव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच तपास केला जाणार आहे. अद्याप हत्येचं कारण कळू शकलेलं नाही, पण ही घटना खूप गंभीर आहे. कारण लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधीसोबतच ती घडली आहे,” असं दुबे म्हणाले.