परिस्थिती अनुकुल नसतानाही टीम इंडियाने मंगळवारी अभूतपूर्व कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात पराभवाचं पाणी पाजलं. भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते संजय झा यांनी काँग्रेस पक्षाला भारताच्या विजयातून काही प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला आहे. “भारतीय संघ पहिल्या कसोटीत ३६ धावांवर ऑल आउट झाला. पण नंतर अविश्वसनीय पुनरागमन केलं. यामध्ये माझ्या जुन्या पक्षासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. आम्हाला ४४ जागा मिळाल्या (लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागा ) उठा…धूळ झटकून द्या… आणि लढा द्या आणि भूतकाळाबद्दल ओरडणे…रडणे आता थांबवा”, असा सल्ला संजय झा यांनी ट्विट करून काँग्रेसला दिला आहे.

संजय झा काँग्रेसचे माजी प्रवक्ता होते. पक्षनेतृत्वाच्या धोरणावर जाहीर टीका करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं. संजय झा यांनी काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांची तुलना टीम इंडियाने पहिल्या कसोटीत केलेल्या गचाळ कामगिरीसोबत केली आहे. झा यांनी २०१४ मधील काँग्रेसच्या जागांचा उल्लेख केला असला तरी त्यानंतर झालेल्या २०१९ च्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा पराभव झाला आणि काँग्रेसला जागांच्या संख्येत थोडीफारच वाढ करता आली. क्रिकेट मैदानावरील भारताच्या विजयामधून प्रेरणा घ्यावी असा सल्ला झा यांनी माजी पक्षातील सहकाऱ्यांना दिलाय.

आणखी वाचा- ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची केली ‘बोलती बंद’, म्हणाला “आयुष्यभर आठवण…”

दरम्यान, विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. नवागतांचा भरणा असूनही अजिंक्य रहाणेच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत मुरब्बी यजमानांना धूळ चारली आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. शुबमन गिल (९१) आणि ऋषभ पंतच्या (८९ नाबाद) नीडर फटकेबाजीला चेतेश्वर पुजाराच्या (५६) भक्कम फलंदाजीची साथ मिळाली आणि ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभवाची झळ लागली. मालिकेत २-१ अशा विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर करंडक राखलाच, शिवाय आयसीसी कसोटी स्पर्धा गुणतक्त्यात अव्वल स्थानावरही झेप घेतली.