उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तेथील राजकीय वातावरण अधिकच गरम झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे. तर, योगी सरकारला सर्वस्तरातून टीकेला सामोरं जावं लागत आहे. पीडितेला न्याय देण्याची मागणी जोर धरत असून, पीडितेच्या कुटुंबीयांची विविध पक्षांसह संघटनांच्या प्रतिनिधींकडून भेट घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेख आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पीडित कुटुंबास आपल्याबरोबर घेऊन जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, प्रशासनाने नकार दिल्याने, आता उद्या आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.

“मी हाथरस येथून आताच माझ्या कुटुंबाला भेटून निघालो आहे, मी स्तब्ध आहे. माझ्या बहिणीचे आई-वडील दोघेही रडत एकच सांगत होते की बेटा आम्हाला येथून घेऊन चल. माझ्या कुटुंबाला भीती दाखवली जात आहे. मी कुटुंबाला आपल्या बरोबर घेऊन जाऊ इच्छित आहे. मात्र, प्रशासनाने नकार दिला आहे. आम्ही उद्या कोर्टात अपील करू. असं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे.”

पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आझाद म्हणाले,”पीडितेच्या कुटुंबीयांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. अन्यथा आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ. ते इथे सुरक्षित नाहीत. या घटनेचा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांच्या निगराणीखाली चौकशी करण्यात यावी,” अशी मागणीही चंद्रशेखर यांनी केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रचंड विरोधानंतर काल पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांचं भेट घेऊन सांत्वन केलं.