बहुतांश गुन्हेगार पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर आधीच्या गुन्हयाबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करतात. उडवाउडवीची उत्तरे देण्याकडे त्यांचा कल असतो. पण अरविंदकुमार जयंतीलाल व्यास या गुन्हेगाराने कुठलेही आढेवेढे न घेता मागच्या २० वर्षात १५०० बाईक चोरल्याची कबुली दिली. अरविंदकुमार व्यास (५०) बुधवारी दुचाकीवरुन जात असताना त्याला गोध्रा येथे पोलिसांनी अटक केली.

मेहसाणा जिल्ह्यातील खेरालू तालुक्यातील लुनवा गावात राहणाऱ्या अरविंद कुमार व्यास १९९६ पासून बाईक चोरी करत आहे. आपण आपली सवय सोडण्याचा प्रयत्न केला. पण समाजामध्ये कोणी स्वीकारत नसल्याने पुन्हा आपण गुन्हेगारीकडे वळलो असे त्याने सांगितले. अरविंदकुमारने दीवाळीपासून आतापर्यंत १९ बाईक चोरल्या आहेत.

बाईक चोरी प्रकरणी याआधी सुद्धा त्याला अटक झाली आहे. दीवाळीच्यावेळी तो तुरुंगात होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा बाईक चोरी सुरु केली. गोध्रा पोलिसांनी त्याच्याकडून आतापर्यंत चोरलेल्या १९ बाईक जप्त केल्या आहेत. वडोदरा, गोध्रा भागातून त्याने सर्वाधिक बाईक चोरल्या आहेत.

अरविंदकुमार व्यासला दारुचे व्यसन असून त्याची दोन लग्ने झाली आहेत. पोलिसांनी सांगितले की, अरविंदकुमारला बाईक चोरण्याची सवय जडली होती. बाईकला कोणी खरेदीदार नसेल तरीही तो बाईक चोरायचा. काही वेळा तो चोरलेल्या बाईक वेगवेगळया ठिकाणी सोडून द्यायचा तर काही वेळा चोरलेल्या बाईक इतरांना वापरण्यासाठी द्यायचा असे पोलिसांनी सांगितले.

मोठया संख्येने बाईक जिथे पार्क केलेल्या असायच्या अशीच ठिकाणे तो चोरीसाठी निवडायचा. त्याला अटक केली त्यावेळी अनेक किल्ल्या त्याच्याकडे सापडल्या. तो या किल्ल्या वेगवेगळया बाईकला लावून बघायचा. त्यातील एखाद दुसऱ्या बाईकचे लॉक उघडल्यानंतर तो बाईक घेऊन पसार व्हायचा. आपल्याला ज्या पोलिसाने अटक केली एकदा त्याचीच चारचाकी गाडी चोरली होती असे अरविंदकुमारने पोलीस चौकशीत सांगितले.

चोरीचा मार्ग सोडून मी सर्वसामान्यांसारखी नोकरी देखील करुन पाहिली. सुरक्षारक्षक म्हणून मी काम केले आहे. पण समाजाने मला स्वीकारले नाही. त्याच नैराश्यातून आपण पुन्हा चोरी सुरु केली असे अरविंदकुमार व्यासने सांगितले.