एखाद्या ठिकाणी जेव्हा चोरी होते तेव्हा पोलिसांसमोर मुख्य आव्हान असतं ते चोरांना पकडणं आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करणं. मात्र चोर त्याच्या आधारकार्डामुळेच पकडला गेला तर? होय तुम्ही वाचलेली ओळ योग्यच आहे. ही घटना खऱोखरच घडली आहे, देहरादूनमध्ये एका चोरट्याने एका दुकानावर डल्ला मारला. तिथल्या सगळ्या वस्तू लंपास केल्या, मात्र चोरी करुन पोबारा केल्यावर मागे स्वतःचं आधारकार्ड विसरला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस जेव्हा चोरी झालेल्या दुकानात आले तेव्हा त्यांना तिथे चोराचे आधारकार्ड सापडले. आधारकार्डवरील माहितीवरुन पोलिसांनी चोराला अटक केली आहे.

देहरादून या ठिकाणी चोरीची ही घटना गेल्या महिन्यात झाली. त्यानंतर दुकानाचे मालक अनिल सेठी यांनी पोलिसात धाव घेतली. चोरट्याने छत फोडून दुकानात प्रवेश केला होता अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक लोकेंद्र बहुगुणा यांनी दिली. खरंतर हा चोरटा आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता मात्र तो कोण आहे याची ओळख पटवणे कठीण जात होते. मात्र सेठी यांना त्यांच्या दुकानाचे छत स्वच्छ करताना आधारकार्ड सापडले. ज्याची माहिती सेठी यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांना हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडला. नीरज असे या चोरट्याचे नाव आहे हे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याचा छडा लावला आणि त्याला अटक केली.

दुकानाच्या छतावार चोराचे पाकिटच मालक सेठी यांना सापडले. त्यात आधारकार्डही होते, या आधारकार्डावर त्याचा पत्ता होता. त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असताना नीरज हा चोरटा दुसरीकडे राहण्यासाठी गेला असल्याचे आम्हाला समजले. आम्ही आमच्या खबऱ्यांना नीरजची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर नीरजला अटक केली असे बहुगुणा यांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नीरजची आम्ही कसून चौकशी केली तेव्हा त्याने चोरीचा गु्न्हा कबूल केला. नीरजने पहिल्यांदाच चोरी केली नव्हती. तो याआधी म्हणजेच २०१२ मध्येही चोरी केल्याप्रकरणी तुरुंगात गेला होता. आता त्याची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात करण्यात आली आहे. त्याच्याकडून आम्ही ६५ हजार रुपये किंमत असलेले मोबाइल जप्त केले आहेत. नीरजचे आई वडील वर्षभरापूर्वीच वारले. त्याने अजून कोणकोणत्या ठिकाणी चोऱ्या केल्या याबाबत त्याची चौकशी सुरु आहे असेही पोलीस उप निरीक्षक लोकेंद्र बहुगुणा यांनी सांगितले.