एखादी वस्तू चोरी गेल्यानंतर ती परत मिळेल किंवा पोलीस ती मिळवून देतील याची अपेक्षा थोडी कमीच असते. पण केरळमधील एका व्यक्तीला चोरी गेलेले सोन्याने दागिने परत मिळाल्याने आश्चर्याचा धक्काच बसला. आश्चर्याचा धक्का बसण्याचं कारणंही तसंच होतं. कारण दागिने पोलिसांनी मिळवून दिले नाही तर चोरानेच परत आणून दिले होते. चोराला पश्चात्ताप झाल्याने त्याने हे दागिने आपल्या मालकाला परत दिले. यासोबत त्याने एक माफीनामाही लिहिला होता. केरळमधील अल्लप्पुझ्झा येथील ही घटना आहे.

मधू कुमार मंगळवारी संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराचा मुख्य गेट लॉक केला नव्हता. रात्री १०.३० वाजता जेव्हा ते परत आले तेव्हा घरात सर्व सामानाची उलथापालथ करण्यात आली होती. घराचा मागचा दरवाजाही खुला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी त्यांनी संशय असणाऱ्या एका व्यक्तीचंही नाव पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्यादृष्टीने तपासही सुरु केला होता.

मात्र त्यानंतर जे झालं ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. गुरुवारी सकाळी त्यांच्या घराच्या गेटबाहेर चोरी गेलेले दागिने कोणीतरी ठेवले होते. त्यासोबत एक चिठ्ठीदेखील होती. त्यात लिहिलं होतं की, ‘प्लीज मला माफ करा. मला पैशांची गरज असल्याने दागिने चोरले होते. यापुढे मी असं करणार नाही. कृपया पोलिसांकडे जाऊ नका’.

यानंतर मधू कुमार यांनी पोलिसांनी सगळी हकीकत सांगितली आणि कारवाई न करण्याची विनंती केली.