एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर ती पुन्हा परत मिळेल याची अपेक्षी तशी फारच कमी असते. त्यातही ज्याने चोरी केली आहे तोच चोर ती वस्तू परत आणून देत असेल तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण अशीच एक घटना कोईम्बतूर येथे घडली आहे. सुरेश कुमार यांची दोन आठवड्यांपूर्वी बाईक चोरीला गेली आहे. पण जेव्हा कुरिअर सेवेच्या माध्यमातून आपली बाईक परत मिळाली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

१८ मार्च रोजी सुरेश कुमार यांनी आपल्या वर्कशॉपसमोर बाईक पार्क केली होती. पण काही वेळाने ते परतले तेव्हा त्यांची बाईक चोरीला गेली होती. सुरेश यांनी मित्रासोबत पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सुरेश कुमार यांना कुरिअर ऑफिसमधून फोन आला. ऑफिसमध्ये येऊन तुमच्या नावे आलेलं पार्सल घेऊन जा असं त्यांना सांगण्यात आलं. सोबतच डिलिव्हरीसाठी १४०० रुपये भरण्यास सांगितलं. सुरेश कुमार यांना सुरुवातीला काहीच कळलं नाही. पण जेव्हा आपली चोरलेली बाईक कुरिअरमधून परत आल्याचं कळताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ही बाईक त्याने का परत केली याची मला कल्पना नाही, पण मी खूप आनंदी आहे अशा भावना सुरेश कुमार यांनी व्यक्त केल्या आहेत.