हैदराबादच्या निजाम वस्तू संग्रहालयात झालेल्या चोरीचा पोलिसांना एका आठवड्यात छडा लावला आहे. हॉलिवूड स्टाईल चोरी करत चोरांनी मुंबईला पळ काढला होता आणि एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहिले होते. पोलिसांना त्यांचा माग काढत बेड्या ठोकल्या आहेत. चोरांनी निजाम वस्तू संग्रहालयातून सोन्याचा रत्नजडित डबा, रत्नजडीत कप आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.

दोघांनी चोरलेल्या वस्तू त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. चोरण्यात आलेला रत्नजडित डब्याची किंमत कोटींमध्ये आहे. हा डबा कदाचित निजामनेदेखील वापरला नसावा, मात्र चोरांपैकी एकजण रोज जेवण्यासाठी हा डबा वापरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

निजाम संग्रहालयातून सोन्याचा रत्नजडित डबा आणि कप यांसह मौल्यवान वस्तूंची चोरी

‘२ सप्टेंबरला दोघे चोर वेंटिलेटर शाफ्टच्या सहाय्याने संग्रहालयात शिरले होते. दोघांनीही सोन्याचा कव्हर असलेलं कुराण चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उचलणार इतक्यात अजान सुरु झालं. आता ही त्यांची भावना होती की ते घाबरले माहित नाही पण त्यांनी त्या पवित्र पुस्तकाला हात लावला नाही’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

चोरी झालेल्या वस्तूंची किंमत १ कोटी आहे. मात्र मौल्यवान असल्याने त्यांना खूप किंमत मिळाली असती. दुबईमधील मार्केटमध्ये त्यांना ३० ते ४० कोटी रुपये मिळाले असते असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

चोरी केल्यानंतर दोघांनी मुंबईला पळ काढला होता. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांना वास्तव्य केलं. मुंबईत त्यांनी कोणीही खरेदीदार मिळत नसल्याने ते पुन्हा परतले आणि पोलिसांच्या हाती लागले.