दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील विश्वास नगर भागात स्थित युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी ५५ लाख रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत प्रवेश केला आणि  बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी तोडुन रोख रक्कम चोरी केली. सोमवारी सकाळी बँक कर्मचारी त्यांच्या कामावर पोहोचले. त्यानंतर झालेल्या घटनेवीषयी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागला नाही.

वृत्तसंस्था एएनआय नुसार शुक्रवारी आणि शनिवारी ठेवीदारांकडून बँकेत जमा केलेली रोक चोरी झाली आहे. तर बँकेच्या दुसर्‍या बाजूला ठेवलेले सर्व लॉकर व दागिने सुरक्षित आहेत.

हेही वाचा- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल करणार्‍या व्यक्तीला पुण्यातून अटक

बँकेत दरोडा पडल्याची बातमी समजताच खातेदारांनी चिंतेत बँकेच्या बाहेर रांगा लावल्या. एका खातेदाराने सांगितले की, आमच्या बर्‍याच नातेवाईकांचे या बँकेत खाते आहेत. सकाळी चोरी झाल्याची माहिती मिळताच आम्ही येथे आलो. आमची खाती व्यवसायाशी जोडलेली असून आम्हाला व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती मिळत नाही.

चोरट्यांनी चोरी करण्यासाठी भिंतीत पाडलेल्या भगदाडाचा पोलीस तपास करत आहेत. तसेच बँक आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून एका चोरट्याची ओळख पटली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या चोरीमध्ये किती लोकांचा सहभाग होता हे अद्याप समजू शकलेले नाही. गुन्ह्यात सामील असलेल्या सर्वांची ओळख पटविण्यासाठी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.