इटलीतील व्हेनिस या शहरात असलेल्या व्हेनिस पॅलेसमध्ये एका सुंदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतीय घडणावळीच्या अल थानी दागिन्यांचाही समावेश होता. मात्र प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ जानेवारी रोजी मात्र चोरट्यांनी नेमक्या याच दागिन्यांवर डल्ला मारत हे दागिने लांबवले आहेत. अल थानी बनावटीचे हे दागिने अत्यंत मोहक आणि आकर्षक आहेत. त्यांची किंमत लाखो युरोंच्या घरात आहे.

प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भारतीय नक्षीकामाचे दागिने लांबवले. ज्यामध्ये एक ब्रुच, तसेच एक झुमक्यांचा जोड आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. हे दागिने सोने, प्लॅटिनम आणि हिऱ्यांनी मढवण्यात आले होते. त्यामुळे या दागिन्यांची किंमत भारतीय चलनाप्रमाणे कोट्यवधींच्या घरात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रदर्शनातला अलार्म वाजला. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने सगळ्या परिसरात नाकाबंदी केली. मात्र तोपर्यंत चोर दागिने घेऊन पसार झाले होते.

व्हेनिस येथील प्रदर्शनात लावलेला सुरक्षा अलार्म वाजण्यात उशीर झाल्यामुळे चोरांना पळून जाता आले अशी माहिती इटलीची मुख्य वृत्तसंस्था ‘एएनएसए’ने दिली आहे. या प्रदर्शनातले काही सीसीटीव्ही फुटेज मिळते आहे का? त्याद्वारे या चोरांचा सुगावा लावता येतो आहे का? यासाठी आता व्हेनिसमधले पोलीस प्रयत्न करत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. प्रदर्शनात असलेले अल थानी दागिने हे जगात सर्वाधिक सुंदर आणि कोरीव काम असलेले दागिने आहेत. त्याच्या नक्षीकामाला तोड नाही असे मत फोर्ब्स मॅगझिनने नोंदवले आहेत. व्हेनिस पॅलेसमध्ये अल थानी दागिन्यांचे २७० सेट आहेत. ज्यापैकी २ दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत.

अल थानी दागिन्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर आपल्याला समजते की हे दागिने अत्यंत वेगळ्या प्रकारात मोडतात. मोगलांच्या काळात ज्याप्रकारे दागिने घडवले जायचे त्या प्रकारे यांचा घडणावळ असते. पाहता क्षणी कोणीही या दागिन्यांच्या प्रेमात पडू शकतो. चोरट्यांनी नेमक्या याच प्रकारतल्या दोन दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या दागिन्यांची किंमत लाखो युरोंच्या घरात आहे.