उच्चांकी दरांमुळे ‘एचपीसीएल’चे अध्यक्ष सुराणा यांची सूचना

पेट्रोल व डिझेलवरच्या करनिर्धारणाचा सरकारने फेरविचार करून ग्राहकांना दिलासा द्यावा, कारण दोन्हींच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक  गाठला आहे, असे एचपीसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश कुमार सुराणा यांनी सांगितले.

एकापाठोपाठ दहा दिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली असून किरकोळ विक्रीचे  दर वाढले आहेत. आम्ही किंमती आंतरराष्ट्रीय दरानुसार बदलत आहोत त्यामुळे आम्हाला या  धोरणात माघार घेता येणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत तेल मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी किंवा सरकारमधील कुणी बैठक घेतल्याची माहिती आपल्याला नाही.

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवर उपाय शोधण्याची गरज आहे. तेल कंपन्यांना यात फार कमी नफा असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती वाढल्यानंतर आम्ही त्यात काही करू शकत नाही. तेल कंपन्या, ग्राहक व सरकार यांचा समतोल ठेवून यावर तोडगा काढण्याची गरज आहे. सरकार तेलाच्या महसुलावर विसंबून आहे. त्यावरच त्यांचा खर्च चालतो. दुसरीकडे ग्राहक तेल वापर कमी करण्यास तयार नाहीत. सरकारने याबाबत कर निर्धारणाचा फेरविचार केलेला नाही. अबकारी कर व व्हॅट कमी केल्यास किमती कमी होऊ शकतील.

दुचाकी ढकला आंदोलन

दरम्यान पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे बुधवारी नाना पेठेतील संत कबीर चौक ते अल्पना चित्रपटगृहापर्यंत दुचाकी ढकल आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.

एसटीची भाडेवाढ लवकरच- रावते

नागपूर: गेल्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा फटका एसटी महामंडळास बसत आहे. सध्या  महामंडळ ४६० कोटीच्या तोटय़ात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बस भाडेवाढीची शक्यता नाकारता येत नाही, असे मत  परिवहन मंत्री आणि  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.