वेगात लसीकरणास प्राधान्य; निती आयोगाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या उत्परिवर्तित होऊन अधिक संसर्गक्षम बनण्याच्या ‘स्वभावा’वर नियंत्रण ठेवता येत नसले तरी लवकरात लवकर लसीकरण, सुरक्षा कवचाचा वापर आणि गर्दी टाळली तर करोनाची तिसरी लाट टाळता येऊ शकेल, असे सकारात्मक मत करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी व्यक्त केले.

विषाणू उत्परिवर्तित होत असून तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर, पाच तासांनी झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी तिसऱ्या लाटेला नियंत्रित करण्याची संभाव्य शक्यता मांडली. खुल्या जागेत फिरायला जाऊ शकता, पण गर्दी जमवून समारंभ करू नका. विषाणूला संसर्गाची संधी देऊ नका. करोनाची नवी लाट येऊ न देणे हे लोकांच्या हातात आहे, असे पॉल म्हणाले. दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर बहुतांश राज्यांनी टाळेबंदीसदृश निर्बंध शिथिल केले असून पुन्हा बाजारांमध्ये व रस्त्यांवर मोठी गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे तिसरी लाट ६-८ आठवडय़ांत येण्याची भीती ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली होती.

उत्परिवर्तित डेल्टा प्लस विषाणूच्या माहितीसाठी जनुकीय क्रमनिर्धारण

जालना : करोनाच्या उत्परिवर्तित डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण राज्यात आढळले असून त्या संदर्भात दक्षता घेऊन शास्त्रीय पद्धतीने माहिती घेतली जात आहे. करोना उत्परिवर्तित नवीन विषाणूंची ओळख पटण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी आयजीआयबी (इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अ‍ॅण्ड इण्टेग्रेटिव्ह बायॉलॉजी) या संस्थेशी करार केलेला आहे. या जनुकीय क्रमनिर्धारणासह (जिनोमिक सिक्वेन्सिंग) राज्यात ‘सारी’ आणि ‘आयएलआय’ आजारांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी-९, जळगाव-७, मुंबई-२ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्य़ांत डेल्टा प्लस विषाणूचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात ‘जनुकीय क्रमनिर्धारण’संदर्भात १०० नमुने घेण्यात येत आहेत. यापूर्वी साडेसात हजार नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आयजीआयबी आणि सीएसआय या संस्थांचे सहकार्य यासाठी घेण्यात येत आहे. ‘एनसीडीसी’ संस्थाही यासाठी सहकार्य करीत आहे.

कोविनसशक्त

लसीकरणाच्या नोंदणीसाठी ‘को-विन’ संकेतस्थळ सशक्त असून अन्य देशांनाही हे तंत्रज्ञान दिले जाईल. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने जागतिक चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. २.४ अब्ज लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली. १८ वर्षांवरील सर्वासाठी लसीकरण नोंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १ कोटी ३७ लाख लोकांनी नोंदणी केली तरीही हे संकेतस्थळ बंद पडले नाही, असे पॉल म्हणाले.

शाळा बंदच!

जूनच्या मध्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी लगेच शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्याची शक्यता डॉ. पॉल यांनी फेटाळली. आत्ता करोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी सर्व शक्यतांचा विचार करावा लागेल. त्यामुळे आरोग्य, शिक्षण अशा विविध मंत्रालयांना एकत्रितपणे आणि अत्यंत काळजीपूर्वक हा निर्णय घ्यावा लागेल, असेही पॉल यांनी स्पष्ट केले.

 

लसमात्रांत अग्रभागी १० राज्ये (लाख)

मध्य प्रदेश       : १७.१४

कर्नाटक          :  ११.३७

उत्तर प्रदेश      : ५.७५

हरियाणा          : ५.१५

गुजरात :           ५.१५

राजस्थान         : ४.५९

तमिळनाडू        : ३.९७

महाराष्ट्र           : ३.८५

आसाम :           ३.६८