भारतीय सेनेने राजस्थानातील पोखरण फायरींग रेंजवर स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील एंटी – टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) ‘नाग’ चे  परीक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) चे कौतुक केले आहे. हे परीक्षण ७ ते १८ जुलै दरम्यान करण्यात आले. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.


या क्षेपणास्त्राची निर्मितीचे कार्य या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल. आतापर्यंत याची चाचणी सुरू होती. २०१८ मध्ये या क्षेपणास्त्राची हिवाळी चाचणी घेण्यात आली होती. भारतीय सेना ८ हजार नाग क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकते, ज्यापैकी सुरूवातीस ५०० क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात क्षेपणास्त्र तयार करणारी एकमेव सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेड करणार आहे.