देशातील तीन करोना प्रतिबंधक लसींपैकी सीरम इन्स्टिटय़ूटच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी परवानगीनंतर लवकरच सुरू केली जाईल. देशातील १४ ठिकाणी १५०० उमेदवारांवर चाचणी घेतली जाईल. कॅडिला हेल्थकेअर आणि भारत बायोटेक कंपन्यांच्या लसींच्या चाचणींचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

हीच माहिती मंगळवारी लोकसभेतही देण्यात आली. आयसीएमआर आणि सीरम इन्स्टिटय़ूट दोन लसींवर संशोधन करत आहेत. ऑक्सफर्ड-एक्स्ट्रा झेनिका लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होईल. तसेच, अमेरिकेतील कंपनीची नोव्हाव्हॅक्स या लसीची चाचणीही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी दिली. देशी बनावटीच्या दोन्ही लसींच्या चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक निष्कर्ष आल्याचेही चौबे यांनी सांगितले.

अमेरिका वा अन्य देशांमध्ये जसे करोनाचे प्रचंड शिखर गाठले गेले. मग रुग्णसंख्या कमी होत गेली आता तिथे दुसरी लाट दिसू लागली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत भारताने प्रचंड शिखर गाठले जाणार याची दक्षता घेतली. देशभर टाळेबंदीही प्रभावी ठरली. भारतात मृत्युदरही कमी करण्यात यश मिळाले असा दावा भार्गव यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये ८०-९० हजार वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८३ हजार ८०९ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ४९ लाख ३० हजार २३६ झाली आहे.

प्लाझ्मा उपचारावर  निष्कर्षांनंतर निर्णय

कुठल्या ना कुठल्या विषाणू प्रादुर्भावावर गेल्या १०० वर्षांपासून प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर केला गेला असला तरी ती करोनासाठी प्रभावी ठरू शकते का, याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास केला जात आहे. प्लाझ्मा चाचणीत भारतही सहाभागी झाला असून १४ राज्यांमधील २५ जिल्ह्य़ांमध्ये ही चाचणी केली गेली. त्यात ३९ रुग्णालयांतील ४६४ रुग्णांचा सहभाग होता. प्लाझ्मा उपचारांमुळे मृत्यूदर कमी झाला किंवा सौम्य लक्षणे तीव्र होण्यापासून रोखली गेली असे आढळले नाही. चाचण्यातून आलेल्या निष्कर्षांचा अभ्यास झाल्यानंतर ते प्रसिद्ध केले जातील मगच प्लाझ्मा उपचार कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ  शकेल, असे भार्गव यांनी सांगितले.

ऑक्सिजनचा तुटवडा नाही!

आजघडीला देशभरात ६९०० मेट्रिक टन ऑक्सिजनची उत्पादनक्षमता असून ऑक्सिजनचा तुटवडा नाही. राज्यांच्या स्तरावर ऑक्सिजन सिलिंडर पुरवठय़ाचे व्यवस्थापन नीट केले गेले, तर वेळेवर वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध होईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे व राज्यांनी केंद्राकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली आहे.

संसर्गदर ८.४ टक्के

देशभरातील सरासरी संसर्गदर ८.४ टक्के असून १४ राज्यांमध्ये ५ हजारांपेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत, तर १८ राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्ण ५ हजार ते ५० हजारांच्या टप्प्यात आहेत. पाच रुग्णांमध्ये एक रुग्ण उपचाराधीन आहे. ३८.५ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकूण ५.८ कोटी नमुना चाचण्या झाल्या असून गेल्या आठवडय़ात ७६ लाख चाचण्या केल्या गेल्या. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आण तमिळनाडू या पाच राज्यांमध्ये ६० टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत, अशी माहिती भूषण यांनी दिली.