भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील संघर्षांमुळे निर्माण झालेल्या तिढय़ाबाबत मंगळवारी लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेची तिसरी फेरी पार पडली. त्यात पूर्व लडाखमधून सैन्य माघारीचे सोपस्कार व इतर बाबींचा समावेश होता.

यावेळी प्रथमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताच्या बाजूकडील चुशूल क्षेत्रात चर्चा झाली. आधीच्या चर्चेच्या फेऱ्या चीनच्या बाजूकडील मोल्दो येथे झाल्या होत्या. आधीच्या दोन चर्चात गलवान, पँगॉग त्सो व इतर अनेक भागात चीनच्या सैन्याने माघार घेणे व पूर्वी होती तशी परिस्थिती निर्माण करणे या मुद्दय़ांवर भर देण्यात आला होता. भारत व चीन यांच्या लष्करात पूर्व लडाखमध्ये गेले सात आठवडे संघर्ष सुरू असून त्यातूनच १५ जूनला गलवान खोऱ्यात चीनच्या हिंसाचारात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. चीनच्या बाजूनेही प्राणहानी झाली असून त्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही.

२२ जून रोजी दोन्ही बाजूंनी पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबाबत मतैक्य दर्शवले होते. भारतीय पथकाचे नेतृत्व आज १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले, तर चीनच्या बाजूचे नेतृत्व तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे मेजर जनरल लिउ लिन यांनी केले.

लेफ्टनंट जनरल पातळीवरची पहिली चर्चा ६ जूनला झाली होती. त्यात दोन्ही देशांनी गलवानमधील वादग्रस्त ठिकाणाहून माघार घेण्याचे मान्य केले होते, पण नंतर गलवानमध्येच चीनने हिंसाचार केला होता. ५ व ६ मे रोजी भारत व चीनच्या २५० सैनिकात पँगॉग त्सो येथे चकमक झाली त्यानंतर ९ मे रोजी उत्तर सिक्कीममध्ये चकमक झाली होती.