दक्षिण मेक्सिकोत झालेल्या शक्तीशाली भूकंपादरम्यान लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. मृतांमध्ये ५ महिला, ४ पुरुष आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.


ओयाक्साका राज्याच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या इंटेरिअर मिनिस्टर, राज्याचे गव्हर्नर यांना घेऊन जाणारे हे लष्करी हेलिकॉप्टर मोकळ्या जागेतील दोन वाहनांवर कोसळले. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी या अपघातातून वाचले आहेत.

दरम्यान, रात्री येथे ७.२ रिश्टर स्केल क्षमतेचा मोठा भुकंप झाला. यावेळी काही लोक घाबरून घराबाहेर पडले. दरम्यान, लॅडिंगच्या तयारीत असलेले हेलिकॉप्टर व्यवस्थित जमिनीवर उतरु शकले नाही. तसेच हेलिकॉप्टर उतरत असलेल्या मोकळ्या जागेत लोकांनी गर्दी केल्याने हेलिकॉप्टर लोकांच्या अंगावर कोसळले. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. या भुकंपामध्ये दक्षिण मेक्सिकोतील हजारो घरे उद्धवस्त झाली आहेत. तर ओयाक्साका राज्यात ५० घरे भुईसपाट झाली आहेत.

गेल्या सहा महिन्यांत मेक्सिकोमध्ये झालेला हा दुसरा मोठा भुकंप असून यापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या शक्तीशाली भुकंपामुळे मेक्सिको शहर उध्वस्त झाले होते. यामध्ये ४७१ लोकांचा मृत्यू झाला होता.