उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असून उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने आतापर्यंत ३५ बळी घेतले आहेत, तर हरयाणा, पंजाब आणि जम्मूतील अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती असून दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या आठवडय़ापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात आणि भूस्खलन होऊन आणखी तीन जण मरण पावले आहेत. अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले असून पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. गुरुवापर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरडी कोसळल्याने आणि पुरामुळे अनेक रस्ते बंद पडल्याने ५०० हून अधिक जण वाटेतच अडकून पडले आहेत. पावसाने आतापर्यंत ५७४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

उत्तरकाशी जिल्ह्य़ाला मुसळधार पावसाने झोडपले असून सोमवारी जिल्ह्य़ातील विविध गावांमधून आणखी काही मृतदेह मिळाल्याने आतापर्यंत पावसाच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे, तर अन्य सहा जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.