News Flash

२०० कोटींच्या लग्नानंतर हिल स्टेशन झाले डम्पिंग ग्राऊंड, जमला ४००० किलो कचरा

संपूर्ण शहरात रोज गोळा होतो २००० किलो कचरा

हिल स्टेशन झाले डम्पिंग ग्राऊंड

डेस्टीनशन वेडिंग आता भारतीयांसाठी काही नवीन राहिलेले नाही. अनेक सेलिब्रिटीजपासून उच्च मध्यम वर्गीयही अनेक भन्नाट ठिकाणी जाऊन डेस्टीनेशन वेडिंग करतात. अशाच प्रकारच्या एका हाय प्रोफाइल डेस्टीनेशन वेडिंगची मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये चर्चा होती. देहरादूनमधील औली येथे पार पडलेल्या या लग्नासाठी चक्क २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या लग्नासाठी भव्य सेट, मोठा मंडप, नक्षीकाम असणारे अनेक मंच असं बरचं काही उभं करण्यात आलं होतं. मात्र आता हा लग्नसोहळा आटपल्यानंतर औलीमध्ये चक्क ४ हजार किलो कचरा जमा झाल्याने पर्यटनस्थळाचे अगदी डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल स्थानिक नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नसल्याने या कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न अधिकारी आणि स्थानिकांसमोर उभा राहिला आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील भारतीय उद्योजक असणाऱ्या अतुल गुप्ता यांच्या दोन्ही मुलांची म्हणजेच सर्यकांत आणि शशांक यांची लग्न मागील आठवड्यामध्ये औली येथे पार पडली. अगदी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीपासून ते कतरीना कैफच्या डान्सपर्यंत अनेक गोष्टींमुळे हे लग्न चर्चेत आलं. या लग्नासाठी २०० कोटींची खर्च करण्यात आल्याचं अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या लग्नासाठी भव्य सेट्स उभारण्यात आले होते. यामध्ये ग्लास हाऊस, अलिशान मंडप, स्वित्झर्लंडवरुन मागवलेल्या फुलांचे मंडप अशा अनेक गोष्टी लग्नसमारंभासाठी उभारण्यात आल्या होत्या. मात्र लग्नानंतर उभारण्यात आलेल्या सर्व गोष्टी कचऱ्यात जमा झाल्या आहेत. वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोशीमठ नगरपरिषदेचे अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली या लग्नसोहळ्यानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छा केली जाणार होती. कुमार आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांसमोर प्लास्टिक, काचा, अन्न याबरोबर पाहुण्यांनी टाकलेला कचरा असं सर्वकाही मिळून जवळजवळ ४००० किलोच्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे.

नगरपरिषदेच्या अध्यक्षांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी औलीमध्ये २० कर्मचारी, दोन निरिक्षक, एक कनिष्ठ अभियंता आणि १० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. ‘सामान्यपणे जोशीमठ परिसरामधून दररोज २००० किलो ओला आणि सुका कचरा जमा होतो. मात्र १८ ते २२ जून दरम्यान झालेल्या या लग्न सोहळ्यानंतर दररोज ४००० किलो कचरा गोळा केला जात आहे. यापैकी बहुतांश कचरा हा लग्नसमारंभाच्या ठिकाणाहून गोळा केला जात आहे. सामान्यपणे औलीमध्ये कचरा गोळा करण्यासाठी चार कर्मचारी पुरेसे असतात मात्र आता इतका कचरा गोळा करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे,’ असं नगपरिषदेचे अध्यक्ष सांगतात.

द टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार या लग्नाची तयारी सुरु होती त्यावेळेस न्यायलयामध्ये जनहितयाचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये लग्नाच्या तयारीसाठी पर्यावरणाची हानी होत असून याबद्दल न्यायलयाने योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली होती. मात्र या लग्नामध्ये प्लॉस्टिक, थर्माकॉल बॅग, काचेचे सामान, प्लेट, कप वापरले जाऊ नयेत असे आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिले होते.

गुप्ता कुटुंबियांच्या या लग्नासाठी अनेक हायप्रोफाइल लोकांनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, योग गुरु रामदेव बाबा, गायक बादशाह यांचा समावेश होता. लग्न झालेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची पाकिटं आणि बाटल्या पडल्या असून आमच्या गाया तेथेच चारा खात असल्याने त्यांच्या जिवालाही याचा धोका असल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 6:19 pm

Web Title: this 200 crore wedding in auli left behind 4000 kg trash turning the hill station into a dumpyard scsg 91
Next Stories
1 डेरा प्रमुख राम रहीमला मिळणार ४२ दिवसांचा पॅरोल
2 ‘मोदीजी नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमचा जुना भारत द्या’
3 पश्चिम बंगाल : कांकिनारा परिसरातून ५० बॉम्ब जप्त
Just Now!
X