अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचा विकास मंदावणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केल्याची प्रतिक्रिया काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
देश महागाईच्या संकटाशी दोन हात करत असताना देशाच्या विकासाची प्रगती स्थिर ठेवण्याचा दृष्टीकोन यूपीएच्या अर्थसंकल्पात राहिला होता. परंतु, जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून विकासाची गती मंदावण्याचीच चिन्हे आहेत असे राहुल गांधी म्हणाले.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांनी हा अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी असून यामध्ये गरीबांना काहीच स्थान नाही आणि बेरोजगारांवरही अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हटले. तर, आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी अर्थसंकल्पावर ‘खोदा पहाड, निकला चुहाँ’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी एकही कल्याणकारी निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ उद्योगपतींना अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. तर, या अर्थसंकल्पामुळे महागाई कमी होईल असे अजिबात वाटत नसल्याचे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटले आहे.