एअर इंडियाच्या डिसइन्व्हेस्टमेंटची अर्थात विक्रीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कंपनीतील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार आहे. यासाठी सरकारने खरेदीदारांकडून प्रस्ताव मागितले आहेत. त्यामुळे लवकरच याची लिलाव प्रक्रिया सुरु होईल. मात्र, एअर इंडियाच्या या विक्री व्यवहारावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी सरकारची ही कृती देशविरोधी असल्याचे म्हणत याविरोधात आपल्याला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “हा व्यवहार संपूर्णपणे देशविरोधी असून आता मला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही. आपण आपल्या कुटुंबातील मौल्यवान वस्तू विकू शकत नाही.”

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही एअर इंडियाच्या विक्रीच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच यावर सध्या संसदीय पॅनलमद्वारे चर्चा केली जात असल्याचे सांगत त्यांनी टीका केली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय आणि कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्र सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या लिलाव पत्रानुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसमधील १०० टक्के भाग भांडवल विकला जाणार आहे. त्याचबरोबर एअर इंडिया आणि एसएटीएसची जॉईन्ट व्हेंचर कंपनी असलेल्या ‘एआयएसएटीएस’मधील एअर इंडियाचा ५० टक्के हिस्सा विकला जाणार आहे. एअर इंडियाच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणही जो लिलाव जिंकेल त्या कंपनीला मिळणार आहे.