काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नाराजी व्यक्त करत, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावाखाली घेण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. तसेच, याबद्दल आम्हाल आक्षेप असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जी प्रक्रिया सुरू केली होती ती योग्य होती. सुरूवातीस सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या मोठ्या पक्षाला बोलावण्यात आले. आता तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला आज रात्री साडेआठ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र, दरम्यान असे एकदम काय घडले की, दुपारीच त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली, हे योग्य नाही. जर नियम, कायदे आपण पाहिले तर, स्पष्ट बहुमत नसेल तर सर्वात मोठ्या पक्षाला सरकार बनवण्याची संधी द्यायला हवी. ज्याचे भाजपाने गोवा, मणिपूर व मेघालय येथे पालन नाही केले. मात्र या ठिकाणी त्याचे पालन करण्याचा प्रयत्न झाला. अशातच ऐनवेळी जो काही बदल झाला ते पाहता, निश्चितपणे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल आम्हाला आक्षेप आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. आज सकाळपासूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भातली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.