वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा हे वाक्य अनेकदा रस्त्याच्या बाजूच्या पाटीवर पाहायला मिळते. मात्र कधीतरी वाहतुकीचे नियम न पाळल्यास वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडल्याने दंड ठोठावला जातो आणि पावती फाडायची वेळ येते. अशीच वेळ बंगळुरुमधील एका दुचाकी चालकावर आली. मात्र जेव्हा पोलिसांनी या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्याने त्याचे मागील रेकॉर्ड तपासले तेव्हा त्याच्या नावावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे ५२ गुन्हे असल्याचे पोलीस हवलदाराच्या लक्षात आले आणि त्याने त्या व्यक्तीच्या हातात एक फूट लांब पावती दिली. दंड म्हणून या व्यक्तीकडून ५ हजार ३०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

उडूगोडी पोलीस स्थानकांच्या हद्दीत येणाऱ्या कोरमानागला वॉटर टँक सिग्नलजवळ ऑन ड्युटी असणाऱ्या हवलदार रवी कुमार यांनी सिग्नल तोडल्याप्रकरणी एका व्यक्तीला अडवले. आनंद नावाच्या या व्यक्तीचे मागील गुन्हे कुमार यांनी तपासून पाहिले असता त्याच्या नावावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे ५२ गुन्हे असल्याचे दिसून आले. हा आकडा पाहून कुमार यांनाही धक्काच बसला. आनंदविरोधात ५२ वेळा नियम मोडल्याची नोंद होती. प्रत्येक वेळेस आनंदच्या पत्त्यावर पावती पाठवण्यात आली होती. मात्र त्याने एकदाही दंडाची रक्कम भरली नव्हती. अखेर कुमार यांनी आनंदकडून या सर्व ५३ प्रकरणांमध्ये दोषी अढळल्यामुळे ५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. आनंद हा डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. शहरांमधील अनेक भागांमध्ये वस्तू पोहचवताना आनंदने अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. ‘आनंदने एकदाही दंड न भरल्याचे लक्षात आल्यानंतर मी त्याच्या सर्वच्या सर्व ५३ प्रकरणांसाठी दंडाची ५ हजार ३०० रुपयांची एकाच पावती दिली. ही पावती जवळजवळ एक फूट लांबीची झाली होती,’ अशी माहिती कुमार यांनी ‘बंगळुरु मिरर’शी बोलताना दिली.

शहरामध्ये एखाद्या व्यक्तीविरोधात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे नोंदवण्याची आणि ते एकाच वेळी वसूल करण्याची ही पहिलीच वेळ असेल असंही कुमार म्हणाले. बंगळुरुमध्ये डिलेव्हरी बॉयचे प्रमाण खूप जास्त असून अनेकदा ते वाहतुकीचे नियम मोडतात असं निरिक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. ‘२० जुलैपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अनेक पटींने वाढवण्यात आल्याने नियम पाळणेच जास्त फायद्याचे ठरु शकते,’ असं मत पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवल्याचे ‘बंगळुरु मिरर’च्या वृत्तात म्हटले आहे.

‘फूड डिलेव्हरी अॅपसाठी काम करणारे अनेक डिलेव्हरी बॉईज शहरामध्ये दुचाकीवरुन प्रवास करतात. वेळेत ग्राहकांपर्यंत पदार्थ पोहचवण्याच्या नादात त्यांच्याकडून अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते. सिग्नलला न थांबणे, गाडी चालवताना ग्राहकांशी फोनवर बोलण्यासारखे प्रकार हे डिलेव्हरी बॉईज अनेकदा करतात. त्यांना वाहतूक कोंडीमधून मार्ग काढत वेळेवर पोहचणे गरजेचे असले तरी त्यासाठी हे वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करण्यासाठीचे कारण असू शकत नाही’, अशी भूमिका शहरातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.